जळगाव - सेवाभावी संस्थांची प्रशासनाला साथ मिळाल्यानंतर रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळते, याचे जिवंत उदाहरण म्हणून जळगावातील मोहाडी येथील रुग्णालयाकडे पाहता येईल. गेल्या अडीच महिन्यांच्या काळात या रुग्णालयातून 1 हजार 160 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. सेवाभावी संस्था आणि प्रशासनाच्या परस्पर समन्वयातून निर्माण झालेल्या सुसज्ज आरोग्य सेवेमुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची परवड झाली नाही. हे रुग्णालय कोरोनाच्या उपचारासाठी खऱ्या अर्थाने एक 'रोल मॉडेल' ठरले आहे.
हेही वाचा -जळगावनंतर मुक्ताईनगर नगरपंचायतीत भाजपला धक्का? 6 नगरसेवक हाती शिवबंधन बांधणार
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जळगाव शहर हे हॉटस्पॉट ठरले होते. कोरोना विरुद्धच्या लढाईत प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत असल्याने रुग्णांची फरफट सुरू होती. अशा परिस्थितीत प्रशासनाने विविध सेवाभावी संस्थांना मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला जळगावातील सेवारथ संस्था, रोटरी क्लब, मराठा प्रीमियर लीग, लेवा पाटीदार स्पोर्ट्स फाउंडेशन, रेडक्रॉस सोसायटी आणि जैन इरिगेशन कंपनीने प्रतिसाद देत मदतीचा हात पुढे केला. यात मोहाडी येथील शासकीय महिला रुग्णालयाच्या अर्ध्या इमारतीत कोविड रुग्णालयाची उभारणी करण्यात आली. 100 बेडसाठी सुसज्ज व्यवस्था उभारण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील स्टाफ रुग्णांवर उपचार आणि देखभालीसाठी नेमण्यात आला. अशा परिस्थितीत विविध सेवाभावी संस्था जिल्हा प्रशासनाच्या मदतीला धावून आल्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखणे शक्य झाले.
सेवाभावी संस्थांनी अशी सांभाळली जबाबदारी
मोहाडी रुग्णालयासाठी सेवारत संस्थेतर्फे डॉ. रितेश पाटील, डॉ. नीलिमा सेठीया, दिलीप गांधी, पुखराज पगारिया यांच्या माध्यमातून 8 रुग्णवाहिका, तसेच 45 ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर देण्यात आले. लेवा पाटीदार स्पोर्ट्स फाउंडेशन व मराठा प्रीमियर लीगच्या माध्यमातून चंदन कोल्हे, महेश चौधरी, नितीन धांडे, हिरेश कदम, श्रीराम पाटील हे सर्वजण या ठिकाणी रुग्ण, नातेवाईक आणि रुग्णालयातील स्टाफसाठी जेवणाची व्यवस्था सांभाळत आहेत.