महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकऱ्याची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या परप्रांतीय भामट्यास अटक - jalgaon breaking news

झारखंड राज्यातील जामताडा जिल्ह्यातील काही भामटे हे महाराष्ट्रातील लोकांची दिशाभूल करून त्यांची ऑनलाईन पद्धतीने आर्थिक फसवणूक करत आहेत.

Breaking News

By

Published : Jan 2, 2021, 7:08 PM IST

जळगाव - झारखंड राज्यातील जामताडा जिल्ह्यातील काही भामटे हे महाराष्ट्रातील लोकांची दिशाभूल करून त्यांची ऑनलाईन पद्धतीने आर्थिक फसवणूक करत आहेत. अलीकडच्या काळात असे प्रकार सातत्याने घडत आहेत. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील धामणगाव येथील एका शेतकऱ्याची गेल्या वर्षी जुलै महिन्यात दीड लाख रुपयांची ऑनलाईन पद्धतीने आर्थिक फसवणूक झाली होती. या प्रकरणाचे कनेक्शन देखील जामताड्याशी निघाले असून, पोलिसांनी या गुन्ह्यात एका तरुणाला अटक केली आहे.

झारखंडच्या अतिदुर्गम भागातून अटक-

मजहर जमाल अन्सारी (वय 26) असे पोलिसांनी अटक केलेल्या भामट्याचे नाव आहे. तो झारखंड राज्यातील जामताडा जिल्ह्यातील अलगचुवा-शितलपूर येथील रहिवासी आहे. जळगाव पोलिसांच्या सायबर सेलच्या पथकाने त्याला झारखंडच्या अतिदुर्गम भागातून अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल, काही एटीएम कार्ड्स, पॉस मशीन, असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला 5 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

चाळीसगाव तालुक्यातील धामणगाव येथील नितीन आनंदराव निकम (वय 41) हे शेतीचा व्यवसाय करतात. संशयित आरोपी मजहर अन्सारी याने 24 ते 30 जुलै दरम्यान निकम यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. तसेच आपण 'इंडियाबुल्स धनी' या फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. 3 लाख रुपयांचे कर्ज कमी व्याजदरात देण्याचे आमिष मजहर याने नितीन यांना दिले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून नितीन यांनी त्याला कर्जासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. नंतर त्याने नितीन व त्यांच्या पत्नीचे आधारकार्ड, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे एटीएम कार्डचे फोटो मोबाईलवर व्हाट्सएपच्या माध्यमातून मागवून घेतले. नंतर कर्जाची रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्याचे सांगून नितीन यांच्या मोबाईलवर येणारे ओटीपी विचारून घेतले. अशा पद्धतीने मजहरने त्यांच्या व पत्नीच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या खात्यातून 1 लाख 59 हजार 701 रुपये वळते करून फसवणूक केली होती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नितीन यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सायबर पोलिसात 3 ऑगस्ट 2019 गुन्हा दाखल झाला होता.

तांत्रिकदृष्ट्या तपास करून आवळल्या आरोपीच्या मुसक्या-

जळगाव सायबर पोलिसांनी या गुन्ह्याचा तांत्रिकदृष्ट्या तपास करून छडा लावला. त्यानंतर एक पथक आरोपीच्या अटकेसाठी झारखंड राज्यात गेले होते. 31 डिसेंबर रोजी आरोपी मजहरला अटक करण्यात आली. त्याला घेऊन सायबर पोलिसांचे पथक शनिवारी जळगावात आले.

हेही वाचा-सरकार काम करण्यासाठी आहे, शहरांचे नाव बदलण्यासाठी नाही - संजय निरुपम

ABOUT THE AUTHOR

...view details