महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 23, 2020, 3:38 PM IST

ETV Bharat / state

श्रमीक रेल्वेने मध्यप्रदेशात जाणाऱ्या मजूर महिलेला प्रवासात सुरू झाल्या प्रसवकळा, अन्... .

पाचोरा रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी श्रमीक रेल्वे आली. यावेळी स्थानकात एकच धावपळ सुरू झाली. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान धावपळ करुन रुग्णवाहिकेला घेऊन आले होते. मात्र काय घडत आहे, हे कोणालाच कळत नव्हते. दरम्यान थोड्या वेळानंतर गोड बातमी आली, अन् सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

train
श्रमीक रेल्वे

जळगाव - श्रमिक रेल्वेने मुंबईहून मध्यप्रदेशात निघालेल्या परप्रांतीय महिलेची सुखरूप प्रसूती झाली. ही घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी घडली. रोशनी श्यामसुंदर जगताप असे प्रसूत झालेल्या महिलेचे नाव आहे. तिने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. रेल्वे पोलीस व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवून परप्रांतीय महिलेची सुखरूप प्रसूती घडवून आणल्याने माणुसकीचे दर्शन घडले आहे.

मुंबईहून मध्यप्रदेशात जाण्यासाठी निघालेल्या श्रमिक रेल्वेतील एस-191297 कोचमध्ये एक परप्रांतीय गर्भवती महिला प्रवास करत होती. प्रवासात तिला अचानक प्रसवकळा सुरू झाल्या. यावेळी रेल्वे गाडीने चाळीसगाव स्थानक सोडले होते. त्यामुळे रेल्वेने प्रवास करत असलेल्या महिलेला प्रसूती वेदना होत आहेत, असा निरोप पाचोरा येथील रेल्वे स्थानक अधीक्षकांना देण्यात आला.

अधीक्षकांनी रेल्वे पोलीस सुभाष बोरसे यांना मदतीच्या सूचना केल्या. सुभाष बोरसे यांनी तत्काळ रेल्वे स्थानकावर रुग्णवाहिका मागवली. श्रमिक रेल्वे पाचोरा येथे प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर थांबवण्यात आली. रेल्वे पोलीस उपनिरीक्षक एस. बी. पाटील, कर्मचारी ए. एच. तडवी, पी. बी. दुशिंग व सुभाष बोरसे यांनी या कोचमध्ये जाऊन प्रसूती वेदना होणारी महिला रोशनी जगताप, तिचा पती श्‍यामसुंदर जगताप व सासू लखाबाई जगताप यांना डब्यातून खाली उतरवले.

जगताप कुटुंबीय मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील बाबंदल येथील असून ते मुंबईहून आपल्या गावी परतत होते. रेल्वे कर्मचाऱ्यांनी जगताप कुटुंबातील तिघांना रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालयात आणले व येथे प्रसूती वेदना होणाऱ्या रोशनी जगतापवर डॉक्‍टर व आरोग्य सेवकांनी उपचार केले. उपचार सुरू असताना रोशनी यांची प्रसूती होऊन गोंडस बाळाला तिने जन्म दिला. माता व बालकाची प्रकृती ठणठणीत आहे. रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दाखवलेली सतर्कता व मानवता कौतुकास्पद ठरली आहे. या मजुरांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाचे आभार मानले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details