जळगाव -येत्या वर्षभरात जिल्हा परिषदेपासून ते जिल्हा बँकेपर्यंत विविध स्थानिक निवडणुका होणार आहेत, या संस्थांवर आपल्याला आपली सत्ता आणायची असेल, तर आपल्याला पक्षसंघटन मजबूत करावे लागेल. सत्ता ही संघटनेवर अवलंबून असल्याने जिल्हाभरात शिवसेनेचे ४ लाख सदस्य नोंदविण्याचे उद्दिष्ट पूर्ण करा, असे आवाहन पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
शुक्रवारी अजिंठा शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या शिवसेनेच्या जिल्हा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्थानिक स्वराज्य संस्थांवर सत्तेसाठी संघटन महत्त्वाचे ज्या मतदारसंघात आमदार नाहीत, तेथे लक्ष केंद्रित करा
यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्हा परिषदेत आपली सदस्य संख्या १५ पेक्षा अधिक नाही. ज्या ठिकाणी आमदार आहेत, तेथेच हे सदस्य निवडून येतात. त्यामुळे यापुढच्या निवडणुकीत ज्या मतदारसंघात आपले आमदार नाहीत, अशा ठिकाणी काम करावे लागणार आहे. येत्या वर्षात निवडणुका अधिक असल्याने त्या ठिकाणी पक्षसंघटन वाढवणे अवश्यक आहे.
स्थानिक निवडणुकांमध्ये देखील महाविकास आघाडीची युती
विधानपरिषद निवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे महाविकास आघाडीची ताकद दिसून आली आहे. भाजपला थोपवण्यासाठी स्थानिक निवडणुकीत देखील महाविकास आघाडी मिळून काम करेल. असेही यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले. दरम्यान यावेळी आमदार किशोर पाटील यांच्याकडून शेतकऱ्यांच्या डीपी दुरुस्तीसाठी निधी देण्याची मागणी करण्यात आली.
डीपीसाठी ६० लाखांचा निधी
शेतकऱ्यांना डीपी वेळेत मिळत नाही, डीपीअभावी पिकांना पाणी देता येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे नुकसान थांबवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून 60 लाखांचा निधी देण्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.