जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात कवयित्री बहिणाबाई अध्ययन व संशोधन केंद्र सुरू करण्यास बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. या केंद्रामुळे बहिणाबाईंच्या साहित्याचा सर्वांगाने अभ्यास करणे शक्य होणार आहे.
गेल्यावर्षी ११ ऑगस्ट २०१८ रोजी विद्यापीठाचे 'कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ' असा नामविस्तार झाले होता. त्यानंतर ८ ऑक्टोबर २०१८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विद्यापीठात नामविस्तार सोहळा साजरा झाला होता. या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी विद्यापीठाच्या मागण्यांचे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवावेत. विद्यापीठाच्या पाठीशी सरकार उभे राहील, अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर विद्यापीठाने विकासाचे काही प्रस्ताव सरकारकडे सादर केले होते. डिसेंबर महिन्यात कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेवून विद्यापीठात कवयित्री बहिणाबाई अध्ययन व संशोधन केंद्र सुरू करण्याबाबत चर्चा केली होती.