महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात सात अग्निशमन बंबांची जबाबदारी अवघ्या एका फायरमनवर - जळगाव जिल्हा बातमी

जळगाव महापालिकेला चार नवीन अत्याधुनिक अग्निशमन बंब प्राप्त झाले आहेत. पण, त्या बंबांचा वापर करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी वर्गच महापालिकेकडे नाही. अशा परिस्थितीत एखादी आपत्कालीन घटना घडली तर महापालिका प्रशासन कशा पद्धतीने उपाययोजना करणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Jan 13, 2021, 7:36 PM IST

Updated : Jan 13, 2021, 8:02 PM IST

जळगाव -दाेन वर्षे सतत पाठपुरावा केल्यानंतर अखेर महापालिकेला चार नवीन अत्याधुनिक अग्निशमन बंब प्राप्त झाले आहेत. पण, त्या बंबांचा वापर करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी वर्गच महापालिकेकडे नाही. पाच लाख लाेकसंख्येच्या जळगाव शहरात केवळ एक अधिकृत प्रशिक्षित फायरमॅन आहे. कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी वर्षभरापासून प्रस्ताव आस्थापना विभागात धूळखात पडून आहे. त्यामुळे चार बंब मिळाले असले तरी त्यांचा वापर हाेणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत एखादी आपत्कालीन घटना घडली तर महापालिका प्रशासन कशा पद्धतीने उपाययोजना करणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

बोलताना नगरसेवक व स्थायी समितीचे सभापती

अग्निशमन विभागाच्या बळकटीकरणासाठी प्रयत्नच नाहीत

आराेग्य विभागाप्रमाणेच अग्निशमन विभागाचे प्रचंड महत्त्व आहे. 24 तास सुरू असलेल्या या अग्निशमन विभागाच्या बळकटीच्या दृष्टीने आजपर्यंत महापालिकेच्या प्रशासनासह सत्ताधाऱ्यांनी काेणतेही प्रयत्न केलेले दिसत नाही. महापालिकेकडे जुन्या पद्धतीचे तीन व अत्याधुनिक पद्धतीचे चार बंब आहेत. त्यासाठी 1 फायर ऑफिसर, 1 सहायक फायर ऑफिसर, 1 प्रशिक्षित फायरमन आहे. याशिवाय 10 सहायक फायरमन, 19 शिपाई मजूर दर्जाचे कर्मचारी व 2 महिला कर्मचारी आहेत. 7 अग्निशमन बंब असताना त्यांची जबाबदारी अवघ्या एका प्रशिक्षित फायरमनवर आहे.

वर्षभरापूर्वी दिला प्रस्ताव

महापालिकेतील अत्यंत महत्त्वाचा विभाग असलेल्या अग्निशमन विभागात प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नियुक्तीसाठी विभागामार्फत आस्थापना विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावावर निर्णयासाठी पुन्हा एप्रिल महिन्यात पाठपुरावा करण्यात आला. पण, अजूनपर्यंत काेणतीही प्रक्रिया सुरू झालेली नाही.

मानधन, कंत्राटी पद्धतीने भरती करणे शक्य

अग्निशमन विभागाकडेच आपत्कालीन विभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे 24 तास कर्मचारी नियुक्त करावे लागतात. अशा परिस्थितीत माेठी घटना घडल्यास केवळ चालकांचा उपयाेग हाेत नाही. त्यासाठी अनुभवी कर्मचाऱ्यांची गरज असते. महापालिका मानधनावर अथवा कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करून गरज पूर्ण करू शकते. चार नवीन वाहनांचा वापर करण्यासाठी आणखी 48 कर्मचाऱ्यांची गरज आहे. स्थायी समितीच्या सभेतदेखील याच विषयावर प्रशासनाला घेरण्यात आले हाेते.

प्रशासनाला नाही गांभीर्य - प्रशांत नाईक

या विषयासंदर्भात शिवसेनेचे नगरसेवक तथा स्थायी समितीचे सदस्य प्रशांत नाईक यांनी पक्षाची भूमिका मांडली. महापालिका प्रशासनाला या विषयाशी काहीही देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे. अग्निशमन विभाग हा महत्त्वाचा विभाग असताना त्यातील रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पाच लाख लोकसंख्येच्या जळगाव शहरात आपत्कालीन घटना घडली तर मोठी तारांबळ उडून जीवित व वित्तहानी होऊ शकते. अशा परिस्थितीत रिक्तपदे प्रशासनाने तातडीने भरायला हवीत, अशी मागणी प्रशांत नाईक यांनी केली.

रिक्त पदांबाबत पाठपुरावा सुरू - राजेंद्र घुगे पाटील

अग्निशमन विभागातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा केली आहे. या विषयासंदर्भात सत्ताधारी भाजपकडून प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला जात आहे. आता अग्निशमन विभागाला 4 अत्याधुनिक बंब प्राप्त झाले आहेत. त्यासाठी आवश्यक असलेले फायरमन देखील तातडीने भरले जातील. याबाबत आमचे प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी दिली.

हेही वाचा -जळगावात ठिकठिकाणी प्लास्टिक पतंगांची विक्री, प्रदुषण वाढण्याची भीती

हेही वाचा -दीपनगरात साकारत आहे ६६० मेगावॅट क्षमतेचा सुपर क्रिटीकल प्रकल्प

Last Updated : Jan 13, 2021, 8:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details