जळगाव - कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी लग्न समारंभास केवळ ५० नातेवाईकांनाच उपस्थित राहाता येणार आहे. याबाबत शासनाच्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आदेश काढले आहेत. लग्न समारंभ करण्यापूर्वी संबंधितांना महापालिका क्षेत्रात आयुक्तांकडून, तालुका व ग्रामीण भागासाठी तहसीलदारांकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. वाजंत्रीसाठी पोलिसांकडून परवानगी गरजेची आहे.
लग्नात गर्दी होणार नाही, याची हमी द्यावी लागेल
लग्न समारंभात येणाऱ्या पाहुण्यांची संख्या केवळ ५० असेल, सर्वांच्या तोंडाला मास्क असेल, सर्वच जण शारीरिक अंतराचे पालन करतील. गर्दी होणार नाही, याची हमी तहसीलदार, पोलिसांना द्यावी लागेल. मिरवणूकही काढता येणार नाही. ध्वनिक्षेपण यंत्रणा वापरता येणार आहे. मंगल कार्यालय, सामाजिक भवन अथवा अन्य ठिकाणी जर लग्न समारंभ होत असेल, तर त्याठिकाणी पन्नासच्या दुप्पट शंभर लोक बसू शकतील एवढी जागा असणे अनिवार्य आहे. त्याबाबत तपासणी व कारवाईचे अधिकार संबंधित ठिकाणच्या तहसीलदार, पोलिसांना असणार आहे.