चाळीसगाव (जळगाव) -कांदा साठवणुकीस केंद्र शासनाने घातलेल्या मर्यादेविरोधात व्यापाऱ्यांनी गेल्या आठवडाभरापासून कांदा खरेदी बंद केली होती. परंतु शासनाने ही मर्यादा उठवल्याने सोमवारपासून चाळीसगावातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा खरेदी पुन्हा सुरू होणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे प्रभारी सचिव सतीश पाटील यांनी दिली.
शासन निर्णयाला स्थगिती
चाळीसगाव तालुक्यातील बहुतांश शेतकरी हे मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड करतात. चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पन्न येत असल्याने शेतकऱ्यांना नांदगाव, सटाणा, मालेगाव या ठिकाणी कांदा विक्रीसाठी घेऊन जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन गेल्या दोन वर्षांपासून चाळीसगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उपबाजार समितीत स्वतंत्र कांदा मार्केट सुरू करण्यात आले. या ठिकाणी दररोज सध्या जवळपास १०० वाहने कांदा विक्रीसाठी येतात. सुमारे ५० लाखांची उलाढाल होत असते.
सध्या कांद्याचे भाव देखील तेजीत असल्याने उत्पन्न चांगले मिळत आहे. परंतु केंद्र शासनाने व्यापाऱ्यांनी २५ टनांपेक्षा जास्त कांदा साठवणूक करू नये, अशी अट घातली. याविरोधात व्यापार्यांनी याला विरोध दर्शवून कांदा खरेदीविरोधात संप पुकारला होता. त्यानंतर केंद्र शासनाने हा निर्णय स्थगित करून कांदा खरेदी करण्यासाठी मुभा दिली. यामुळे आता चाळीसगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारपासून कांदा खरेदीला सुरुवात करण्यात येणार आहे.
लाखोंची उलाढाल ठप्प
तीन दिवस लिलाव बंद ठेवण्यात आल्याने लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली. तसेच कांदा उत्पादक शेतकरीही हतबल झाले होते. मात्र, आता कांदा कोंडी फुटली असून सोमवारपासून नागदरोडस्थित कांदा मार्केटमध्ये लिलाव होणार आहेत. रविवारी कांदा व भुसार मार्केटला साप्ताहिक सुट्टी असते. सोमवारपासून कांद्याचे लिलाव नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.