महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने जळगावच्या मेहरुणमध्ये 13 हजार जणांची तपासणी - जळगाव महानगरपालिका

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनपाची 40 पथके वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली तयार करण्यात आली आहेत. रविवारी मेहरूण भागातील नागरिकांचे नमुने घेण्याचे काम या पथकांवर सोपविण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसून, मनपा पथकाला सहकार्य करावे, एकत्र न येता घरातच थांबण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने मेहरुणमधील 13 हजार नागरिकांची तपासणी सुरू
कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने मेहरुणमधील 13 हजार नागरिकांची तपासणी सुरू

By

Published : Mar 29, 2020, 3:58 PM IST

जळगाव -शहरातील मेहरूण परिसरातील एका 49 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शहरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने रविवारी तातडीने या भागातील तब्बल 13 हजार नागरिकांच्या तपासणीला सुरुवात केली आहे. या भागातील 2 हजार 400 घरांचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. ज्यांना कोरोनाची प्राथमिक लक्षण दिसून येतील, अशांना तत्काळ महापालिकेच्या रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात येणार आहे. दरम्यान, मेहरूणसह आजूबाजूचे समतानगर, पिंप्राळा-हुडको हे भागदेखील सील केले असून ते शहरापासून विलग केले आहेत.

शनिवारी रात्री मेहरूण भागातील एकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील 4 जणांना तपासणीसाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. त्यांचे नमुने पुण्याला पाठविण्यात येणार आहेत. यासह संबंधित व्यक्तीच्या घराच्या आजूबाजूच्या घरांमधील अनेकांनाही वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करून घेण्यात आल्याची, माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनपाची 40 पथके वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली तयार करण्यात आली आहेत. रविवारी मेहरूण भागातील नागरिकांचे नमुने घेण्याचे काम या पथकांवर सोपविण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसून, मनपा पथकाला सहकार्य करावे, एकत्र न येता घरातच थांबण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

खबरदारी म्हणून मेहरूण परिसराचा उर्वरित संपर्क शहरापासून तोडण्यात आला आहे. अशा परिस्थितीत मेहरूणच्या नागरिकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा घरपोच करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. या परिसरात कोणीही जाऊ शकत नाही, तसेच तेथून कुणीही बाहेर येऊ शकत नाही. संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे.

महापौरदेखील रस्त्यावर -

महापौर भारती सोनवणे यांनी शनिवारी रात्रीच मेहरूण भागात पाहणी करून नागरिकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन केले. दरम्यान रविवारी सकाळपासून संपूर्ण मेहरूण परिसरात हायड्रोक्लोरिक औषधाची फवारणी सुरू करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details