जळगाव- कोरोना विषाणूचा संसर्ग देशभर पसरत असून जिल्ह्यातील आणखी एक संशयित रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर जळगावातील एकूण रुग्णांची संख्या 2 झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.
कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला रुग्ण हा जळगाव शहरातील बागवान मोहल्ल्यातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. याआधी शहरातील मेहरूण परिसरातील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे. कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेली व्यक्ती ही परदेशातून आली आहे, की ती कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने तिला संसर्ग झाला आहे, याची ठोस माहिती अद्याप मिळाली नाही.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहे. याचाच भाग म्हणून देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. असे असूनही जळगाव जिल्ह्यातील अनेक नागरिक लॉकडाऊनचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
देशातील परिस्थिती लक्षात घेता पुढील काळात नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन केले नाही, तर कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. ही बाब नागरिकांनी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले. येणारे 2 आठवडे अधिक काळजीचे असल्याने जळगाव जिल्हावासियांनी घराबाहेर पडू नये. गर्दीच्या ठिकाणी जावू नये. जीवनावश्यक वस्तूचा कुठलाही तुटवडा भासणार नाही. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनची साखळी अधिक भक्कम करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनदेखील जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले आहे.