महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात दरोडेखोरांचा धुमाकूळ, शेतातील रखवालदार वृद्धाला मारहाण करून विहिरीत फेकले - robber

दरोडेखोरांचा हा थरार दुसऱ्या शेतातील एका आदिवासी कुटुंबाने प्रत्यक्ष अनुभवला. दरोडेखोरांनी या कुटुंबियांना धमकावत त्यांच्या घराचे दार उघडण्यास सांगितले. परंतु, त्यांनी दार उघडले नाही. त्यामुळे हे कुटुंब बचावले. घराचे दार उघडले नाही म्हणून दरोडेखोर तासभर घराबाहेर थांबून होते. त्यांनी दार तोडण्याचा प्रयत्न केला.

one killed by robber

By

Published : Mar 1, 2019, 7:24 PM IST

जळगाव - शहरातील आसोदा रस्ता परिसरात असलेल्या शेतांमध्ये गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. लुटमारीच्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोरांनी एका शेतातील रखवालदार वृद्धाला बेदम मारहाण करून विहिरीत फेकून देत खून केला. त्याचप्रमाणे एका मंदिराची दानपेटीही फोडण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी सकाळी हा प्रकार समोर आला. दौलत एकनाथ काळे (वय 65, रा. मुक्तांगण हॉलजवळ, जळगाव) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
जळगाव पीपल्स बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांचे शहरातील आसोदा रेल्वेगेटजवळ शेत आहे. या शेतात हा प्रकार घडला आहे. दरोडेखोरांनी खून केलेले दौलत काळे हे भालचंद्र पाटील यांच्या शेतात अनेक वर्षांपासून रखवालदार म्हणून कामाला होते. गुरुवारी सायंकाळी ते नेहमीप्रमाणे शेतात आले होते. शुक्रवारी सकाळी ते घरी परत न आल्याने त्यांच्या मुलाने फोन केला असता त्यांनी फोन घेतला नाही. त्यामुळे मुलाने काही नातेवाईकांसह शेतात धाव घेतली असता हा प्रकार समोर आला. दरोडेखोरांनी दौलत काळे यांना बेदम मारहाण केली आहे. त्यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याने वार केले आहेत. मारहाण करून त्यांना विहिरीत फेकून देण्यात आले आहे. या घटनेची माहिती नागरिकांनी तालुका पोलिसांनी दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सुरू आहे.


म्हाळसा देवी मंदिरातही चोरीचा प्रयत्न-
भालचंद्र पाटील यांच्या शेतापासून काही अंतरावर ममुराबाद रस्त्यावर असलेल्या म्हाळसा देवी मंदिरातदेखील दरोडेखोरांनी चोरीचा प्रयत्न केला आहे. दरोडेखोरांनी मंदिरातील दानपेटी तोडली. परंतु, दनपेटीचे कुलूप न तुटल्याने दरोडेखोरांचा डाव फसला. नंतर दानपेटी तशीच सोडून त्यांनी पलायन केले.


एक आदिवासी कुटुंब बचावले-
दरोडेखोरांचा हा थरार दुसऱ्या शेतातील एका आदिवासी कुटुंबाने प्रत्यक्ष अनुभवला. दरोडेखोरांनी या कुटुंबियांना धमकावत त्यांच्या घराचे दार उघडण्यास सांगितले. परंतु, त्यांनी दार उघडले नाही. त्यामुळे हे कुटुंब बचावले. घराचे दार उघडले नाही म्हणून दरोडेखोर तासभर घराबाहेर थांबून होते. त्यांनी दार तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो यशस्वी झाला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details