जळगाव- भरधाव दुचाकीने ट्रॅक्टरला धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात बारावीचा पेपर देऊन दुचाकीने घरी परतणाऱ्या दोघा विद्यार्थ्यांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा विद्यार्थी आणि ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे घडला.
अदनान असद खान (वय 17 वर्षे, रा. अक्सानगर, जळगाव) असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तर मेहमूद शेख अब्दूल रहमान कुरेशी (वय 17 वर्षे, रा. तांबापुरा, जळगाव) हा विद्यार्थी देखील अपघातात जखमी झाला आहे. अदनान आणि मेहमूद हे दोघेही शहरातील मिल्लत ज्युनिअर महाविद्यालयाचे बारावीचे विद्यार्थी आहेत. जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील स्वामी समर्थ विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर त्यांचा बारावीचा हिंदी विषयाचा पेपर होता. दुपारी २ वाजता पेपर सुटल्यानंतर दोघे (एम. एच. 12 व्ही. 3055) क्रमांकाच्या दुचाकीने घरी परतत होते. अदनान दुचाकी चालवत होता. जळगाव-औरंगाबाद रस्त्यावरील कुसुंबा गावाजवळ पटेल फर्निचर समोर ते कारला ओव्हरटेक करताना त्यांच्या दुचाकीने समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरला धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील दोघे फेकले गेले. या अपघातात अदनानचा जागीच मृत्यू झाला तर मेहमूद गंभीर जखमी झाला.