महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कारागृहातील कैद्यांना टॅल्कम पावडरच्या डब्यातून सीमकार्ड पुरवणाऱ्यास अटक

कारागृहातून सुशील मगरे, सागर व गौरव तिघे पळून गेले होते. पोलिसांनी तपास करून सागर व गौरव याला पकडले. त्यांना मदत करणाऱ्या जगदीश, नागेश, अमित, करण, डिगंबर, कमलाकर या सहा जणांना अटक केली. आता केवळ सुशील मगरे हाच पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

jalgaon crime
कारागृहातील कैद्यांना टॅल्कम पावडरच्या डब्यातून सीमकार्ड पुरवणाऱ्यास अटक

By

Published : Sep 25, 2020, 2:25 PM IST

जळगाव -कारागृहातून पळून गेलेले सुशील मगरे, गौरव पाटील व सागर पाटील या तीन कैद्यांना मदत करणाऱ्या एका संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सागर ऊर्फ कमलाकर सुभाष पाटील (वय २४, रा. तांबापुरा, अमळनेर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सागरने कारागृहातील तिघांना मोबाइलचे सीमकार्ड एका टॅल्कम पावडरच्या डब्यात टाकून पुरवल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. जळगाव मध्यवर्ती कारागृहातून 25 जुलै रोजी सुशील मगरे, गौरव व सागर पाटील हे तिघे कैदी पळून गेले होते.

या तिघांना पळून जाण्यासाठी विविध प्रकारे मदत करणाऱ्या पाच जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली होती. कमलाकर पाटील हा सहावा मदत करणारा पोलिसांच्या हाती लागला आहे. कारागृहात पिस्तूल, काडतूस, मोबाइल, सीमकार्ड अशा चार वस्तू पुरवल्यानंतर तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले होते. नुकतीच अटक झालेला कमलाकर पाटील हा कैदी गौरव पाटीलचा मित्र आहे. दोघे अमळनेरचे असल्यामुळे त्यांची मैत्री आहे. गौरवसोबत यापूर्वी काही गुन्ह्यात कमलाकरने साथ दिली आहे.

कारागृहात असलेल्या तिघांना पिस्तूल, काडतूस, मोबाइल व सीमकार्ड या चार वस्तू वेगवेगळ्या दिवशी पोहोचवल्या गेल्या. त्यासाठी कारागृहाबाहेर असलेले जगदीश पाटील, नागेश पिंगळे व अमित चौधरी उर्फ बिहारी, करण रतिलाल पावरा, कारागृहात असलेला डिगंबर बाळू कोळी (रा. अडावद) या पाचही जणांना पोलिसांनी अटक केली. सीमकार्ड खरेदी करण्यासाठी गौरवने कारागहातून नागेशच्या हातून निरोप पाठवला होता. कमलाकर याने नागेशच्या नावाने अमळनेर येथून सीमकार्ड खरेदी केले. हे सीमकार्ड टॅल्कम पावडरच्या डब्यात ठेऊन तो डबा नागेशकडे दिला. कमलाकरच्या दुचाकीने नागेश अमळनेर येथून जळगावात आला.

यानंतर कारागृहाच्या मागील बाजूने सीमकार्ड ठेवलेला डबा आत फेकून गौरवपर्यंत पोहोचवला. त्यापूर्वी मोबाइल देखील अशाच प्रकारे पोहोचवला होता. मोबाइल व सीमकार्ड मिळताच मगरे, गौरव व सागर या तिन्ही कैद्यांनी बाहेर पडण्याचा संपूर्ण प्लॅन आखला. यात बाहेर असलेल्या सहा तर आत त्यांच्यासोबत असलेल्या दिगंबर कोळी अशा सात जणांनी त्यांना मदत केली. मोबाइल आणि सीमकार्ड कमलाकर याने खरेदी केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने अमळनेर येथे सापळा रचून कमलाकरला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. कमलाकर याची दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे.

सुशील मगरे अजूनही फरार

कारागृहातून सुशील मगरे, सागर व गौरव तिघे पळून गेले होते. पोलिसांनी तपास करून सागर व गौरव याला पकडले. त्यांना मदत करणाऱ्या जगदीश, नागेश, अमित, करण, डिगंबर, कमलाकर या सहा जणांना अटक केली. आता केवळ सुशील मगरे हाच पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दरम्यान, मगरे याच्याकडे पिस्तूल असल्यामुळे तो आणखी काही गंभीर गुन्हे करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झालेली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details