जळगाव -गेल्या २ महिन्यात १८ सायकली चोरणाऱ्या एका चोरट्याला जळगाव शहर पोलिसांनी बुधवारी (आज) अटक केली. गणेश दौलत साबळे (वय ४२, रा. खडका रोड, भुसावळ) असे चोरट्याचे नाव आहे. गणेश हा बँड पथकात वादक म्हणून काम करत होता. परंतु, कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर त्याच्या हाताचे काम गेले. त्यामुळे तो गुन्हेगारीकडे वळला होता. गणेश हा बुधवारी शहरात संशयितपणे फिरत होता. शहर पोलिसांच्या गस्ती पथकातील कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्याला हटकले. त्याच्या खिश्यात चाब्यांचा गुच्छा होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने सायकल चोरी करीत असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून एकूण १८ सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
...म्हणून करावी लागली चोरी
कोरोनामुळे सर्वच लहान मोठे उद्योग बंद झाले आहेत. अनेकांचा रोजगारही गेला आहे. अशात हातावर पोट असणाऱ्या गोर गरिबांना या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसतो आहे. त्यामुळे घरातील चूल पेटविण्यासाठी काहींना नाईलाजाने गुन्ह्यांचा मार्ग निवडावा लागत असल्याचे चित्र या घटनेच्या निमित्ताने समोर येत आहे. अशाच विवंचणेतून जळगावमधील गणेशला चोरीचा मार्ग निवडावा लागल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.