जळगाव -शहरातील हरिविठ्ठलनगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने एका नागरिकाच्या चेहऱ्याचा लचका तोडल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली. गंभीर जखमी अवस्थेत या प्रौढाला उपचारासाठी फिरफिर करावी लागली. सुरुवातीला एकही सरकारी किंवा खासगी रुग्णालय जखमी प्रौढाला उपचारासाठी दाखल करून घेत नव्हते. त्यामुळे त्यांची तीन ते चार तास फरफट झाली. अखेर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात त्यांना दाखल करून घेण्यात आले.
जळगावातील हरिविठ्ठलनगर जवळील बजरंग सोसायटी शेजारी राहणारे अशोक वाणी या व्यक्तीला पिसाळलेला कुत्रा चावला. वाणी हे घराबाहेर बसलेले असताना, पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावर एकदम हल्ला केला. वाणी यांच्या तोंडाच्या डावा भागाचा पूर्णपणे कुत्र्याने लचका तोडला. कुत्र्याने वाणी यांच्यासह आणखी एका जणाच्या पायावर चावा घेऊन लचका तोडला. ही घटना घडली, तेव्हा घरात अशोक वाणी व त्यांच्या पत्नी असे दोघेच होते.