जळगाव -जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांवर बुधवारी छाननी प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेदरम्यान भाजप खासदार रक्षा खडसे, उन्मेष पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीमंत्री गुलाबराव देवकर, शिवसेनेच्या महापौर जयश्री महाजन यांच्यासह अनेक दिग्गजांच्या उमेदवारी अर्जांवर हरकती प्राप्त झाल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हरकतींवर सुनावणी प्रक्रिया घेऊन, निकाल राखून ठेवले आहेत. गुरुवारी (२१ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता उमेदवारांच्या वैध-अवैध अर्जांची अधिकृत घोषणा होणार आहे.
एकूण २७९ उमेदवारी अर्ज आहेत दाखल -
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी एकूण २७९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची छाननी प्रक्रिया बुधवारी पार पडली. सर्वच सोसायटी मतदारसंघांसह, ओबीसी, महिला राखीव व इतर संस्था मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्जांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आक्षेप घेतला. त्यामुळे छाननी प्रक्रिया एकाच दिवसात पूर्ण होऊ शकलेली नाही.
इच्छुकांचे देव पाण्यात -
भाजप खासदार उन्मेश पाटील, रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संतोष चौधरी, घनश्याम अग्रवाल, माजीमंत्री गुलाबराव देवकर, ॲड. रवींद्र पाटील, शिवसेनेचे आमदार किशोर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजीव देशमुख यांच्या उमेदवारी अर्जांवर आक्षेप दाखल झाले आहेत. त्यामुळे उमेदवारांची कमी पडलेली कागदपत्रे सादर करण्यासाठी चांगलीच धावपळ झाली. अनेक उमेदवारांनी तातडीने आपल्या वकिलांना पाचारण करून, सुनावणी प्रक्रियेत आपली बाजू मांडली. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाजू ऐकून घेत निकाल राखून ठेवला. त्यामुळे इच्छुकांचे देव पाण्यात आहेत.
'यांचे' अर्ज बाद झाल्याची चर्चा, अन एकच खळबळ -
जिल्हा बँकेत भाजप खासदार रक्षा खडसे व राष्ट्रवादीचे ॲड. रवींद्र पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. मात्र, याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे चर्चेला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.