जळगाव -राज्य शासनाच्या निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यात संचारबंदीसह विशेष निर्बंधात १५ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. परंतु, जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यांच्या आत असल्याने कडक निर्बंधांमध्ये काहीअंशी शिथिलता प्रदान करण्यात आली आहे. त्यात अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू असेल. तर स्टँड अलोन ठिकाणी असलेली नॉन इसेन्सियल सेवेची सर्व दुकानेही सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोमवारी सायंकाळी याबाबतचे आदेश निर्गमित केले. सुधारित आदेशानुसार, सर्व प्रकारची केश कर्तनालये (सलून), स्पा सेंटर्स, जिम पूर्णपणे बंद राहतील. अत्यावश्यक कारणांव्यतिरीक्त दुपारी २ वाजेनंतर नागरिकांना मुक्तपणे संचार करण्यास बंदी राहील. दरम्यान, भविष्यात जळगाव जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर १० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक झाल्यास व ऑक्सिजन बेडची उपलब्धता ४० टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास नव्याने निर्बंध जारी केले जाणार आहेत.
हेही वाचा -औरंगाबाद : पोलीस ठाण्यातील तोडफोडप्रकरणी आमदार प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा
काय आहेत आदेश?
a) अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने दररोज सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु राहतील.
b) स्वतंत्र ठिकाणी असलेली (Standalone Single shops) इतर प्रकारचे सर्व दुकाने हे केवळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत सुरु राहतील. सदरची Non-Essential दुकाने दर शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी पूर्ण वेळ बंद राहतील. सर्व Essential व Non-Essential प्रकारच्या दुकानांच्या प्रवेशाच्या ठिकाणी/काऊंटर समोर एकावेळी ५ पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश राहणार नाही.
c) दुकान चालकांनी दुकानांच्या दर्शनी भागात बँक काऊंटरप्रमाणे काच/प्लास्टीकचे पारदर्शक शीट किंवा कमी खर्चात करावयाचे असल्यास पारदर्शक प्लास्टीक पडदा यांचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच सदर पडद्यातून केवळ ग्राहकास वस्तूंची देवाण-घेवाण करता येईल एवढीच मोकळी जागा ठेवण्यात यावी.
d) अत्यावश्यक वस्तू व सेवांबाबत घरपोच वितरण सुविधा (Home deliveries) ह्या दररोज सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत देता येतील. ई कॉमर्स सुविधेद्वारे Non-Essential वस्तूंची सुविधा सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत देता येतील.
e) सर्व प्रकारची केश कर्तनालये (सलून), स्पा सेंटर्स, जिम पूर्णपणे बंद राहतील.
f) अत्यावश्यक कारणांव्यतिरीक्त दुपारी २ वाजेनंतर नागरिकांना मुक्तपणे संचार करण्यास बंदी राहील.
g) सर्व शासकीय कार्यालयात (आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कार्यालये, पोलीस विभाग, अत्यावश्यक सेवा संबंधित कार्यालये वगळून) २५ टक्के कार्यालयीन उपस्थिती राहील. तथापि, कार्यालयीन उपस्थिती वाढविण्याबाबत कार्यालय प्रमुखांनी निर्णय घ्यावा.
h) जळगाव जिल्हा हा कृषीप्रधान असल्याने व मान्सूनपूर्व शेती विषयक कामे, पेरणी हंगाम सुरु असल्याने कृषी संबंधित सेवा पुरविणारी दुकाने हे दररोज सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरु ठेवता येतील.
i) माल वाहतूक/कार्गो वाहतूक सुरळीतपणे सुरु राहील. तसेच सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेनंतर देखील दुकानात केवळ माल भरण्याकरीता सुट राहील. तथापि सुट दिलेल्या वेळेनंतर दुकानातून ग्राहकास सेवा पुरविता येणार नाही. शासन आदेश दिनांक १२ मे, २०२१ अन्वये नियमांचे उल्लंघन करणारे दुकान मालक/चालक व घटक यांच्याकडून १० हजार रुपये दंड आकारण्यात येईल व पुन्हा चूक केल्याचे आढळून आल्यास कोविड-१९ चा संसर्ग कमी होईपावेतो सदरचे दुकाने बंद ठेवण्यात येतील.
j) वरील नमूद आस्थापनांच्या ठिकाणी काम करणारे सर्व कर्मचारी/कामगार यांचे भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (वय वर्षे ४५ वरील) लसीकरण करुन घेणे बंधनकारक राहील. तसेच सदर कर्मचारी/कामगार यांची साप्ताहिक RTPCR चाचणी करुन घेणे बंधनकारक राहील.
k) मॉर्निंग वॉक, सायकलींग, खुल्या मैदानातील व्यायाम याकरीता केवळ सकाळी ४ ते ८ यावेळेतच सुट राहील.
तर रस्त्यावरील विक्रेत्यांवर कारवाई-
जळगाव महापालिका व जळगाव जिल्ह्यातील सर्व नगरपालिका/नगर पंचायत भागातील गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावर, हातगाडीवर वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची व त्या ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने, शहरातील गर्दी होणाऱ्या अशा ठिकाणी रस्त्यांवर, हातगाडीवर वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना संबंधित वस्तूंची विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात यावी. तथापि, जे वेंडर्स/हॉकर्स सदर निर्देशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर नियमानुसार आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
हेही वाचा -VIDEO : स्कॉर्पिओने पेट्रोल पंपावरील दोघांना चिरडले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद..