जळगाव-जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याने स्थानिक प्रशासनाने 7 ते 13 जुलै दरम्यान, जळगाव शहरासह भुसावळ आणि अमळनेरात लॉकडाऊन घोषित केला होता. लॉकडाऊन संपल्यानंतर गर्दी नियंत्रित करण्यासाठी जळगावात गर्दी होणाऱ्या ठिकाणी ‘नो व्हेईकल झोन’ आखण्यात आले होते. मात्र, नियोजनाअभावी प्रशासनाचा हा निर्णय फसला होता. शहरात प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असल्याने अखेर नो व्हेईकल झोन बंद करण्यात आले असून, सोमवार (27 जुलै) हे झोन नसणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
जळगाव महापालिका क्षेत्रासह भुसावळ, अमळनेर या नगरपालिका क्षेत्रात 7 ते 13 जुलै दरम्यान लॉकडाऊनची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाने केली. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. 14 जुलैपासून अनलॉक करण्यात आले. मात्र बाजारपेठेतील गर्दीच्या ठिकाणी ‘नो व्हेईकल झोन’ करण्यात आले. यामुळे प्रत्यक्ष बाजारपेठेत वाहनांची गर्दी कमी झाली. पण एकाच मार्गावर वाहनांची गर्दी वाढली. नो व्हेईकल झोनमध्ये पत्रे लावून रस्ते अडविले गेले. नागरिकांनी आपल्या घरी जाताना वाहन नेमके कोठून न्यायचे असा प्रश्न पडत होता, कारण पत्रे पॅक होते. काहीजणांनी दुसऱ्या लांबच्या अंतराने जाणे पसंत केले. काहींना तर चक्क तेथील रहिवासी आहोत, याचा पुरावा जवळ बाळगावा लागला. नागरिकांनी हा त्रासही सहन केला. याबाबत तक्रारी वाढल्याने अखेर हा निर्णय प्रशासनाला मागे घ्यावा लागला आहे.