जळगाव -जिल्ह्यातील कोविड रुग्णालय अर्थात जळगाव जिल्हा रुग्णालयात प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे अनेक किस्से समोर येत आहेत. त्याबाबत अनके तक्रारीही होत आहेत. परंतु, रुग्णालय प्रशासन अद्यापही गंभीर नसून, सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्यातचे दिसून येत आहे. ईटीव्ही भारतने गुरुवारी या रुग्णालयात केलेल्या पडताळणीत या कोविड रुग्णालयातील हलगर्जीपणाचे पितळ उघड झाले आहे.
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असणाऱ्या अनेक वॉर्डांमध्ये त्यांच्या नातेवाईकांचा सर्रासपणे वावर सुरू असल्याचे दिसून आले. तसेच याठिकाणी ना सुरक्षारक्षक कोणाला हटकत होते, ना पोलीस कोणाला रोखत होते. दिवस आणि रात्रभर अनेक वॉर्डांमध्ये नातेवाईक आपल्या कोरोनाबाधित आप्तेष्टांची शुश्रूषा करताना दिसून येत आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या अशा बेफिकिरीमुळे कोरोनाचा संसर्ग आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने सुरू आहे. सद्य स्थितीत जिल्ह्यातील कोरोना संसर्गग्रस्त रुग्णांची संख्या 3 हजारांच्या उंबरठ्यावर आहे. एवढी गंभीर परिस्थिती असूनही कोविड रुग्णालय प्रशासनाला गांभीर्य असल्याचे दिसत नाही. कोरोनाबाधित रुग्ण रुग्णालयातून बेपत्ता होणे, कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारातील हलगर्जीपणा, कोरोनाबाधित मृतांचे मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करणे, असे अनेक प्रकार याठिकाणी सातत्याने घडले आहेत. इतकेच नाही तर 2 आठवड्यांपूर्वी एका 83 वर्षीय कोरोनाबाधित वृद्धा बेपत्ता झाल्यानंतर तिचा मृतदेह वॉर्डातील शौचालयात आढळला होता. या घटनेमुळे कोविड रुग्णालयातील अनागोंदी समोर आली होती. यानंतर उपाययोजनांमध्ये सुधारणा होणे, अपेक्षित असतानाही तशी कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली दिसत नाही.
हेही वाचा...मागील २४ तासात आजवरचे सर्वाधिक रुग्ण आढळले, 16 हजार 922 कोरोनाबाधितांची वाढ
शासनाने अधिग्रहित केलेल्या डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्येही दोन दिवसांपूर्वी असाच काहीसा धक्कादायक प्रकार घडला. याठिकाणी मृत्यू झालेल्या एका बाधित रुग्णाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी चक्क नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी जबाबदारीचे खापर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर फोडले. या साऱ्या अनागोंदीच्या पार्श्वभूमीवर 'ई-टीव्ही भारत'ने गुरुवारी दुपारी कोविड रुग्णालयात पाहणी केली. त्यात रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींचे पितळ उघडे पडले. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर ज्या ठिकाणी उपचार केले जातात, त्या ठिकाणी रुग्णांचे नातेवाईक सर्रासपणे ये-जा करत असल्याचे दिसून आले.
हे कमी म्हणून की काय अनेकजण आपल्या आप्तेष्टांना जेवण देणे, पाणी पाजणे, गोळ्या-औषधी देत असल्याचेही 'ई-टीव्ही भारत'च्या कॅमेऱ्यात कैद झाले. धक्कादायक बाब म्हणजे, रुग्णांचे नातेवाईक पीपीई किट, डोळ्यांना गॉगल अशा कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा साधनांऐवजी कोरोना वॉर्डात फिरतात. यामुळे कोरोनाचा संसर्ग बळावण्याची दाट शक्यता आहे.
ईटीव्ही भारत प्रतिनिधीकडून वास्तव उघड...
'ई-टीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने कोविड रुग्णालयात प्रवेश केल्यानंतर रुग्णालयाच्या आतील बाजूस रुग्णांचे नातेवाईक फिरत असल्याचे नजरेस पडले. त्यानंतर प्रतिनिधी अधिष्ठाता दालनाकडून वॉर्ड क्रमांक 1 मध्ये शिरला. याठिकाणी देखील रुग्णांचे काही नातेवाईक होते. ते वॉर्डात ये-जा करत होते. आत काय सुरू आहे हे? पाहण्यासाठी प्रतिनिधी आत जायला लागला तेव्हा तेथील एका परिचारिकेने मज्जाव केला. मात्र, रुग्णांचे नातेवाईक आत सर्रासपणे कसे फिरत आहेत, अशी विचारणा केल्यावर परिचारिकेची बोलती बंद झाली.