महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्पेशल रिपोर्ट : एकनाथ खडसेंची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घुसमट? वाचा सविस्तर... - शरद पवार

४० वर्षांच्या पक्षनिष्ठेवर पाणी सोडून एकनाथ खडसेंना भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागला आहे. याला आता एक वर्ष होईल. मात्र, खडसेंची राजकीय प्रगती दिसत नाही. त्यामुळे काही खडसेंची राष्ट्रवादीत घुसमट होतेय का? यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यावर राजकीय विश्लेषकांनी काय म्हटलंय? वाचा सविस्तर ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट...

khadse
khadse

By

Published : Aug 20, 2021, 2:35 AM IST

जळगाव -एकनाथ खडसे... महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मुरब्बी नेत्याचे नाव. भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील जडणघडणीत खडसेंचा मोलाचा वाटा राहिला आहे. परंतु, पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे त्यांना आपल्या ४० वर्षांच्या पक्षनिष्ठेवर पाणी सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागला. खडसेंना राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधून आता वर्ष होईल. मात्र, आतापर्यंत त्यांच्या राजकीय पुनर्वसनाच्या दृष्टीने ठोस असे काहीही झालेले नाही. उलटपक्षी खडसेंच्या अडचणी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. आक्रमक, अभ्यासू अशी ओळख असलेले खडसे राष्ट्रवादीत काहीसे एकाकी आणि शांत झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांची राष्ट्रवादीत घुसमट होत आहे का? पक्षांतर केल्यानंतर त्यांच्या राजकारणाने कूस बदलली आहे का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न 'ईटीव्ही भारत'ने केला आहे. वाचा हा स्पेशल रिपोर्ट...

राजकीय विश्लेषक दीपक पटवे

'म्हणून' खडसेंनी केला भाजपचा त्याग -

सन २०१४ मध्ये राज्यात भाजप-सेना युतीची सत्ता आली. त्यानंतर खडसेंना मुख्यमंत्रिपदाची मनिषा होती. मात्र, त्यांना मुख्यमंत्रीपद मिळू शकले नव्हते. पण तेव्हा ते महसूलसह १२ खात्यांचे मंत्री होते. दीड वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर खडसेंवर भोसरीतील जमिनीच्या खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला. त्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या पत्नीशी झालेले कथित संभाषण, स्वीय सहाय्यकाचे लाचप्रकरण अशी एक ना अनेक प्रकरणे लागोपाठ समोर आल्याने खडसेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या साऱ्या प्रकरणात झालेले आरोप सिद्ध न झाल्याने खडसेंना मंत्रिमंडळात परतण्याची आशा होती. परंतु, त्यांना अखेरपर्यंत झुलवत ठेवण्यात आले. तेव्हापासून ते पक्षावर प्रचंड नाराज झाले होते. मंत्रिपद गेल्यानंतर लोकसभा निवडणुकीत सुनेच्या तिकिटासाठी देखील त्यांना खूप प्रयत्न करावे लागले. विधानसभा निवडणुकीत तर ते स्वतःला तिकीट मिळवू शकले नव्हते. त्यांच्याऐवजी पक्षाने कन्येला तिकीट दिले. दुर्दैवाने त्यांच्या कन्येचा पराभव झाला. त्यामुळे खडसेंच्या ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीला जबर धक्का बसला. कन्येच्या पराभवाला पक्षांतर्गत कुरघोड्या कारणीभूत असल्याची भूमिका घेऊन खडसेंनी भाजप विरोधात मोट बांधली. याच काळात खडसेंना भाजपने कोअर कमिटीतून बाद केले. तेव्हा खडसेंनी पक्षांतराचे स्पष्ट संकेत देत भाजपच्या श्रेष्ठींविरुद्ध भूमिका घेतली. पुढे त्यांनी भाजपला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय निवडला.

पक्षांतरानंतर खडसेंवर ईडीचे संकट-

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यामागे पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भूखंड प्रकरणातील कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीने फास आवळला आहे. आतापर्यंत त्यांची दोनवेळा चौकशी झाली आहे. तर जावई अटकेत आहेत. पत्नीही ईडीच्या रडारवर आहे. दुसरीकडे, कन्या रोहिणी खडसे-खेवलकर या जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा आहेत. त्या उपाध्यक्षा राहिलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथील श्री संत मुक्ताई साखर कारखान्याला जिल्हा बँकेने दिलेल्या कर्जाप्रकरणी देखील ईडीने नोटीस बजावली आहे. एकप्रकारे ही खडसेंचीच कोंडी मानली जात आहे. ईडीच्या घेऱ्यात खडसे व त्यांचे कुटुंबीय पुरते अडकले आहेत. त्यामुळे खडसेंच्या राजकारणावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादीचा हेतूही फसला, खडसेंचीही कोंडी -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना बेरजेचे राजकारण चांगले जमते, असे म्हटले जाते. एकनाथ खडसे यांच्या रूपाने मातब्बर नेत्याला गळाला लावत त्यांना जळगावात भाजपला शह देण्यात यश आले खरे; मात्र, जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षसंघटन मजबूत करण्याचा हेतू फसला. कारण खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर आजारपण आणि ईडीची चौकशी या दोन कारणांमुळे पक्षात फारसे सक्रिय होऊ शकलेले नाहीत. त्यांना अजूनही पक्षाला पूर्ण वेळ देता येत नाहीये. भोसरीच्या भूखंड गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडी ही स्वायत्त केंद्रीय यंत्रणा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस उघडपणे खडसेंच्या बाजूने उभी राहू शकत नाही, हे नाकारता येणार नाही. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर ते विधानपरिषदेमार्गे आमदार होतील, पुढे मंत्रीपद मिळवतील, असा आडाखा बांधला जात होता. राष्ट्रवादीने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावांमध्ये एकनाथ खडसे यांच्या नावाचा समावेश करत त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचे संकेतही दिले. पण भाजपनेही नेमकी हीच वेळ साधून खेळी करत खडसेंची कोंडी केली. राज्यपालांनी अद्यापही त्यांच्या कोट्यातील १२ सदस्यांच्या नावाच्या यादीवर शिक्कामोर्तब केलेले नाही. त्यामुळे खडसेंची आमदारकी लांबणीवर पडली आहे. राज्यपालांनी निर्णय घेतला नाही तर खडसेंच्या आमदारकीसाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. आगामी काळात रिक्त होणाऱ्या विधानपरिषदेच्या जागांमध्ये खडसेंची वर्णी लागू शकते.

राजकीय विश्लेषक काय म्हणतात?

एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरानंतर त्यांच्या राजकारणाने कूस बदलली आहे का? ते मवाळ झाले आहेत का? याबाबत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना जळगावातील ज्येष्ठ पत्रकार दीपक पटवे यांनी सांगितले की, 'एकनाथ खडसे हे राज्यातील मुरब्बी नेत्यांपैकी एक मानले जातात. ते आता भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. म्हणून ते शांत झाले आहेत, असे म्हणता येणार नाही. त्यांचे राजकारण बदलले आहे का? तर असेही नाही. मुळातच खडसे यांचा स्वभाव आक्रमक आहे. भाजपात असताना ते आक्रमकपणे भूमिका मांडत असत. आपल्यावर अन्याय झाल्याच्या भावनेतून त्यांनी थेट मोदी-शहा यांच्यावरही टीका केल्याचे दिसून आले आहे'.

राष्ट्रवादी काँग्रेस हा व्यक्तीकेंद्रीत पक्ष - दीपक पटवे

'भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे अशा पक्षात एखादा सर्वसामान्य कार्यकर्ताही मोठा नेता होऊ शकतो. राष्ट्रीय पक्षाची कार्यपद्धती वेगळी असते. आता खडसे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेससारख्या एका प्रादेशिक पक्षात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हा व्यक्तीकेंद्रीत पक्ष आहे. या पक्षामध्ये पवार फॅमिलीपेक्षा कुणीही मोठा होऊ शकत नाही, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे खडसेंच्या बोलण्यावर मर्यादा आली असावी. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यावर स्वभाविकच त्यांना कामाची पद्धत बदलावी लागणार, त्यांचा स्वभाव बदलणार. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष वेगवेगळे आहेत. हा फरक खडसेंसारख्या इतक्या अनुभवी नेत्याला लक्षात येत असावा म्हणून त्यांच्यात हा बदल पाहायला मिळत असेल', असे दीपक पटवे म्हणाले.

खडसे जोमाने प्रत्युत्तर देऊ शकतात - पटवे

आता खडसेंवर भाजपचे मागच्या फळीतील नेतेमंडळी सर्रासपणे टीका-टिप्पणी करतात. याबाबत पटवे यांनी मत मांडले. 'खडसे आता विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर भाजपचे नेते टीका करतात. हा राजकीय वर्तणुकीचा एक भाग आहे. भाजपात असताना खडसेंना फटकळ बोलण्यामुळे बरेच काही सोसावे लागले. आता त्यांच्यामागे ईडीचा ससेमीरा सुरू आहे. त्यामुळे फटकळ बोलणे टाळलेले बरे, हे त्यांच्या लक्षात आले असावे. म्हणून ते बोलणे टाळत असतील. दुसरीकडे आपल्यापेक्षा खालच्या फळीतील नेत्यांनी केलेल्या टीकेला उत्तर न देणे ते पसंत करत असावेत. पण खडसेंचा आक्रमक स्वभाव पाहता ते त्यांच्या फळीतील नेत्यांच्या टीकेला त्याच जोमाने प्रत्युत्तर देऊ शकतात', असेही पटवे यांनी सांगितले.

खडसेंना मंत्रीपद मिळू शकते

राष्ट्रवादीत आल्यावर खडसेंना काय मिळाले? यावर मत मांडताना पटवे म्हणाले, की 'एकनाथ खडसे यांचा राजकारणात ४० वर्षे प्रवास राहिला आहे. या प्रवासात भाजपसाठी त्यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या नेत्याला एका प्रादेशिक पक्षाचे प्रादेशिक अध्यक्षपद देणे योग्य नाही. त्यांनाही ते मान्य नसावे. राहिला विषय विधानपरिषद सदस्यत्वाचा, तर त्यात राष्ट्रवादी किंवा शरद पवारांची आडकाठी नाही. भाजपने यातली आडकाठी काढली तर विषयच नाही. समजा भाजपने हा विषय ताणलाच तर खडसेंना आमदारकीसाठी अजून मेपर्यंत वाट पाहावी लागेल. कारण मे महिन्यात विधानपरिषदेच्या अजून काही जागा रिक्त होत आहेत. तेव्हा त्यांना आमदारकी मिळू शकते. पुढे मंत्रिपदही मिळू शकते'.

व्यक्तीकेंद्रीत पक्षामुळे खडसेंवर मर्यादा?

एकनाथ खडसे यांच्या राजकारणाविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार विकास भदाणे यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले, की 'एकनाथ खडसे हे अनुभवी राजकारणी आहेत. भाजप सोडल्यानंतर ते व्यक्तीकेंद्रीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आहेत. त्यामुळे साहजीकच त्यांच्यावर मर्यादा आहेत. राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर त्यांच्यामागे ईडीचा ससेमीरा सुरू झाला आहे. त्यातच आजारपणामुळे ते पक्षाला फार वेळ देऊ शकलेले नाहीत'. 'राष्ट्रवादीने त्यांच्या विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी शिफारस केली. पण भाजपने त्यात खोडा घातला आहे. एकूणच काय तर खडसेंच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे. खडसेंना प्रवेश देण्यामागे राष्ट्रवादीचे भाजपला शह देणे, पक्षसंघटन विस्तार करणे आणि स्वकियांवर अंकुश ठेवणे असे हेतू होते. त्यात भाजपला शह देणे हा एकमेव हेतू साध्य झाला. पक्ष संघटनेचा विस्तार आणि स्वकियांवर अंकुश ठेवण्यात राष्ट्रवादीला यश आलेले नाही. खडसेंचा प्रवेश राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना रुचलेला नाही. त्याचा प्रत्यय यापूर्वी आलाच आहे', असेही विकास भदाणे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details