जळगाव -जिल्ह्यातील पारोळा शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पारोळा शहरातील हवालदार मोहल्ला परिसरातील एका घराच्या छतावर नवजात अर्भक मृतावस्थेत आढळले असून, त्या अर्भकाच्या शरीराच्या कंबरेखालच्या भागाचे कुत्रे किंवा मांजरीने लचके तोडले आहेत. त्यामुळे अर्भकाचा एक पाय गायब आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस तपास सुरू आहे.
अशी आली घटना उजेडात-
पारोळा शहरातील हवालदार मोहल्ला परिसराच्या शेजारी राहणारे इब्राहीम शेख यांच्या घराच्या छतावर हे नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आले आहे. आज (शुक्रवारी) सकाळी नेहमीप्रमाणे त्यांच्या घरातील एक महिला कपडे धुतल्यानंतर घराच्या गच्चीवर गेली. तेव्हा छतावर एक नवजात अर्भक मृतावस्थेत पडलेले होते. अर्भकाच्या शरीराचे लचके तोडल्यामुळे एक पाय नव्हता. हा प्रकार पाहून संबंधित महिला भांबावून गेली. तिने आरडाओरडा केल्यानंतर शेख कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनी घराच्या गच्चीवर धाव घेतली.
अर्भक स्त्री की पुरुष जातीचे, याबाबत संभ्रम-
नवजात अर्भकाच्या शरीराच्या कंबरेखालच्या भागाचे लचके तोडले आहेत. कुत्रे किंवा मांजरीने हे लचके तोडले असावेत, असा अंदाज आहे. त्यामुळे अर्भकाचा एक पाय गायब आहे. लचके तोडल्यामुळे अर्भक हे स्त्री जातीचे आहे की, पुरुष जातीचे याबाबत स्पष्टता होत नाही.
अनैतिक संबंधातून जन्मले असावे अर्भक-
या घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर शेख कुटुंबीय आणि इतर नागरिकांचे जाबजबाब नोंदवण्यात आले. हे अर्भक नेमके कुणाचे याची माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे अर्भकाचा जन्म अनैतिक संबंधातून झाला असावा, असा पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे. अनैतिक संबंधाची वाच्यता होऊ नये, म्हणून हे अर्भक जन्मल्यानंतर ते उघड्यावर टाकून दिले असावे, त्यानंतर कुत्र्यांनी लचके तोडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा. नंतर कुत्र्यांनी हे अर्भक घराच्या छतावर आणून टाकले असावे, असाही पोलिसांचा अंदाज असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस काय म्हणतात...
या घटनेसंदर्भात माहिती देताना पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले की, या घटनेचा सर्व बाजूने तपास सुरू आहे. सध्या अर्भकाचा मृतदेह कुटीर रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृत अर्भक हे आठवडाभराचे असावे, असा अंदाज आहे. त्याच्या बाबतीत शोध लागावा, म्हणून आम्ही शहरासह तालुकाभरातील प्रसूतिगृह, रुग्णालयांकडून प्रसूत मातांची माहिती संकलित करणार आहोत. त्यानंतर काही तरी धागेदोरे मिळू शकतात, असे पोलीस निरीक्षक भंडारे यांनी सांगितले.