जळगाव -जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा वेग कायम आहे. जिल्हा प्रशासनाला बुधवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये पुन्हा 34 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातही सर्वाधिक 19 पॉझिटिव्ह रुग्ण हे एकट्या जळगाव शहरातील आहेत. बुधवारी आढळून आलेल्या 34 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांमुळे जळगाव जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही 1 हजार 885 इतकी झाली आहे.
जिल्हा प्रशासनाला बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये जळगाव शहर 19, जळगाव ग्रामीण 6, पाचोरा, जामनेर आणि चाळीसगाव येथे प्रत्येकी 1 तर यावल, रावेर आणि पारोळा येथे प्रत्येकी 2 असे एकूण 34 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या आठवड्यात जळगाव शहराप्रमाणे जिल्ह्यातील भुसावळ आणि अमळनेरात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे चित्र होते. मात्र, बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये दोन्ही शहरात एकही रुग्ण नव्हता. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात 1 हजार 57 रुग्णांची कोरोनावर मात -
एकीकडे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक व समाधानाची बाब आहे. बुधवारी दिवसभरात जिल्ह्यातील 110 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 1 हजार 57 इतकी झाली आहे. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये तीन महिन्याच्या बालिकेपासून तर 92 वर्षीय वृयोवृद्ध महिलेचा समावेश आहेच. शिवाय विविध व्याधी व जुने आजार असलेलेही रुग्ण आहेत. डाॅ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातील काही खाटा कोव्हीड रुग्णांसाठी अधिग्रहीत केल्यानंतर येथे उपचार केलेल्या तीन महिन्यांची बालिका या रुग्णालयातील पहिली कोरोनामुक्त ठरली आहे.