जळगाव -कोरोनामुळे गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशातच शहरी भागातील काही मोठ्या व इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडला. परंतु ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या, स्मार्टफोनचा अभाव तसेच अशिक्षित पालक अशा कारणांमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणे शक्य नाही. ग्रामीण भागातील ही अडचण लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीत रहावे, कोरोनापासून त्यांना दूर ठेवता यावे, यासाठी काय करता येईल? या विचारातून जळगाव तालुक्यातील सावखेडा खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी 'ओट्यावरची शाळा' हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात विद्यार्थी दररोज आपल्या घराच्या ओट्यावर बसून शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.
सावखेडा खुर्द हे जळगाव तालुक्यातील छोटेसे गाव. तापी आणि गिरणा नदीच्या खोऱ्यात वसलेल्या या गावातील बहुसंख्य लोकांचा उदरनिर्वाहाचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे जवळपास सर्वांची मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतात. गेल्या अडीच वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. सावखेड्यातील विद्यार्थ्यांचेही शाळा बंद असल्याने शैक्षणिक नुकसान होत होते. मात्र या परिस्थितीवर कशी मात करता येईल, या दृष्टीने शाळेचे मुख्याध्यापक अरुणकुमार चौधरी, शिक्षक प्रवीण चौधरी आणि किरण सपकाळे यांनी विचार करायला सुरुवात केली. यासंदर्भात त्यांनी गावातील सरपंच आणि शालेय शिक्षण समितीच्या सदस्यांसोबत चर्चा केली. तेव्हा 'ओट्यावरची शाळा' ही संकल्पना पुढे आली. सर्वांना ही संकल्पना पटली. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना घरच्या घरी शिक्षण मिळेल, त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही म्हणून हा उपक्रम राबविण्यास पालकांनी देखील सहमती दर्शवली.
अशी सुचली ओट्यावरच्या शाळेची संकल्पना-
कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. विद्यार्थी मागच्या वर्गात काय शिकलो, हे देखील विसरत चालले होते. म्हणून राज्य शासनाने ग्रामीण व शहरी भागातील शाळांना ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय दिला. पण ग्रामीण भागात इंटरनेट, स्मार्ट फोन अशा अडचणी असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणे शक्य होत नाही. याच अडचणींमुळे काही ठिकाणी पाड्यावरची शाळा भरवली जात होती. पाड्यावरची शाळा, याच संकल्पनेतून सावखेडा खुर्द शाळेचे मुख्याध्यापक अरुणकुमार चौधरी व शिक्षक प्रवीण चौधरी, किरण सपकाळे यांना 'ओट्यावरची शाळा' ही कल्पना सुचली. त्यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन विद्यार्थी हितासाठी ही कल्पना प्रत्यक्षात अंमलात आणली. एवढेच नव्हे तर स्वतः पदरमोड करून ते आज विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत.
अशी भरते ओट्यावरची शाळा-
सावखेडा खुर्द शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गाचे सुमारे 64 विद्यार्थी आहेत. हे सर्व विद्यार्थी दररोज सकाळी 10 वाजता आपल्या घराच्या ओट्यावर दप्तर घेऊन बसतात. मुख्याध्यापक अरुणकुमार चौधरी, शिक्षक प्रवीण चौधरी आणि किरण सपकाळे हे शिक्षक दररोज सकाळी जळगाव येथून सावखेड्याला येतात. ते आपल्या सोबत प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी दररोजच्या अभ्यासक्रमाच्या झेरॉक्स प्रती काढून आणतात. या प्रती विद्यार्थ्यांना वर्गनिहाय वाटल्या जातात. त्यानंतर तीनही शिक्षक विद्यार्थ्यांना दररोजचा अभ्यासक्रम समजावून सांगतात. मग प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यास करायचा असतो. विद्यार्थी अभ्यास करत असताना शिक्षक गावात फिरतात. त्यांचा अभ्यास तपासून पाहतात. विद्यार्थी चुकला असेल तर त्याला चूक समजावून सांगितली जाते. या साऱ्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांचे पालक, आजी-आजोबा किंवा घरातील शिक्षित व्यक्तीला सहभागी करून घेतले जाते. दररोज वेगवेगळ्या प्रकारचे परिपाठ, गणिते, प्रश्नावली, धडे शिकवले जातात. अशा पद्धतीने सावखेड्यातील शाळा दररोज सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत भरत आहे.
प्रत्यक्ष संवादाने शिक्षण सुरू-