जळगाव - जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 208 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर 9 जणांचे कोरोनामुळे बळी गेले. सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8 हजार 4 इतकी झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसून, मृत्यूचे प्रमाणही वाढतच आहे.
जळगाव जिल्हा प्रशासनाला सोमवारी रात्री प्राप्त झालेल्या तपासणी अहवालात एकूण 208 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यात जळगाव शहर 68, जळगाव ग्रामीण 4, भुसावळ 10, अमळनेर 34, पाचोरा 4, भडगाव, धरणगाव, यावल येथे प्रत्येकी 3, एरंडोल 8, जामनेर 23, रावेर 1, पारोळा 28, चाळीसगाव 11 आणि मुक्ताईनगर 1 असे एकूण 208 रुग्ण आढळले आहेत.
हेही वाचा -जळगावात १७ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही त्याच प्रमाणात वाढत आहे. ही जिल्ह्यासाठी समाधानाची बाब आहे. सोमवारी दिवसभरात 225 जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातून बरे झालेल्या रुग्णांची संख्याही 5 हजार 51 इतकी झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक अर्थातच, जळगाव शहरातील असून ती संख्या 1209 आहे. जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62 टक्के आहे.
नऊ जणांच्या मृत्यूमुळे गाठला चारशेचा टप्पा..
एकीकडे कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असले तरी दररोजची मृत्यूसंख्या आठ-दहाच्या घरात आहे. सोमवारीही त्यात 9 जणांची भर पडल्याने एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या 400 झाली आहे. मृत्यूदर आधीपेक्षा काहीसा कमी झाला असला तरी दररोज होणारे मृत्यू थांबत नसल्याची स्थिती आहे.