जळगाव -महाराष्ट्राच्या एका कन्येने अटकेपार झेंडा रोवला आहे. नेहा नारखेडे असे या मराठमोळ्या कन्येचे नाव आहे. अमेरिकेतील कॉन्फ्लुएंट नावाच्या कंपनीची ती सहसंस्थापक आहे. अमेरिकन शेअर बाजारात आयपीओ आल्यानंतर पहिल्याच दिवशी तिच्या कंपनीने नवा विक्रम प्रस्थापित केला. कंपनीचे शेअर मूल्य वधारल्याने नेहा अब्जाधीश झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नेहा ही पुण्यात शिकली, वाढली आहे.
नेहा नारखेडेचे मूळगाव झोडगा -
नेहा नारखेडे या तरुणीचे वडील दिवंगत चंद्रकांत वासुदेव नारखेडे हे मेकॅनिकल इंजिनीअर होते. पुणे येथे त्यांचा व्यवसाय होता. पुण्यात स्थायिक होण्याआधी ते नागपूर व अमरावतीला होते. मलकापूर तालुक्यातील झोडगा हे त्यांचे मूळगाव आहे, अशी माहिती लेवा पाटीदार समूहाचे प्रमुख नरेंद्र महाजन यांनी दिली.
कॉन्फ्लुएंटचे शेअर मूल्य 25 टक्क्यांनी वाढले -
नेहा नारखेडे सहसंस्थापक असलेली कॉन्फ्लुएंट ही कंपनी अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात आहे. 24 जून रोजी अमेरिकेतल्या नॅस्डॅक या शेअर बाजारात ती लिस्ट झाली. 36 डॉलर्स प्रति शेअर या मूल्यासह दाखल झालेल्या आयपीओद्वारे 828 दशलक्ष डॉलर उभे केले गेले. त्यामुळे कंपनीचे मूल्यांकन 9.1 अब्ज डॉलर एवढे झाले. शेअर बाजाराच्या पहिल्याच दिवसात कॉन्फ्लुएंटच्या शेअर्सच्या मूल्यामध्ये जवळपास 25 टक्के वाढ झाली आणि ते मूल्य 45.02 डॉलर प्रति शेअर एवढे झाले. अमेरिकन शेअर बाजारात पहिल्याच दिवशी आयपीओ आल्यानंतर एवढा भाव मिळवल्याने कॉन्फ्लुएंट कंपनीने विक्रम नोंदवला.
हेही वाचा -जळगाव जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे पुन्हा निर्बंध; वाचा काय सुरू, काय बंद?
अशी झाली कॉन्फ्लुएंट कंपनीची उभारणी -
नेहा नारखेडे आणि तिचे सहकारी जय क्रेप्स व जून राव हे तिघे लिंक्डइन या कंपनीचे कर्मचारी होते. लिंक्डइनवर प्रचंड प्रमाणात येणारे मेसेजेस, नेटवर्क रिक्वेस्ट्स आणि प्रोफाइल व्ह्यूज आदींचे व्यवस्थापन सोपे व्हावे म्हणून त्यांनी क्लाऊड तंत्रज्ञानावर आधारित एक टेक्निकल टूल 2011 मध्ये विकसित केले होते. त्यातूनच पुढे 2014 मध्ये कॉन्फ्लुएंट नावाची कंपनी उभारली. नेहा या कंपनीची सहसंस्थापक आणि चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर आहे. कंपनी स्थापन केल्यानंतर गेल्या 6 ते 7 वर्षांत त्यांनी खूप मेहनत घेतली. याच मेहनतीच्या बळावर त्यांनी आज अमेरिकन शेअर बाजारात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
हेही वाचा -चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे बॅरेजमध्ये काका-पुतण्याचा बुडून मृत्यू