जळगाव-छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन केलेल्या घोषणाबाजीला उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी विरोध केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतापले आहेत. गुरुवारी दुपारी याच विषयाचा निषेध नोंदवण्यासाठी जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वेंकय्या नायडू यांच्या प्रतिमेला काळे फासत जोरदार घोषणाबाजी केली.
राज्यसभेच्या सदस्यत्त्वाची शपथ घेतल्यानंतर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी 'जय भवानी, जय शिवाजी', अशी घोषणाबाजी केली. त्यामुळे संतप्त होऊन उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी विरोध केला, असे कार्यकर्त्यांनी म्हटले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध करणे, ही बाब मराठी माणसांच्या अस्मितेला ठेच पोहोचवणारी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या वर्तवणुकीचा निषेध नोंदवण्यात आला आहे.
जळगाव शहरातील शिवतीर्थाजवळ एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी वेंकय्या नायडू यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन त्यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, ऍड. कुणाल पवार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.