जळगाव -जिल्ह्यातील जामनेर येथील पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध शासकीय योजनांमध्ये अफरातफर करून कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार केला आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून झालेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. गैरव्यवहाराची चौकशी झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपूत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, राजू नाईक, किशोर पाटील, शैलेश पाटील, संदीप हिवाळे, सागर कुमावत हे उपोषणाला बसले आहेत. 24 जूनपासून उपोषणाला सुरुवात झाली असून, शुक्रवारी (दि. 25 जून) उपोषणाचा दुसरा दिवस होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन याप्रश्नी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
काय आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप..?
उपोषणासंदर्भात माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड म्हणाले, जामनेर तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींमध्ये भाजपची सत्ता आहे, त्याठिकाणी सिंचन विहिरींची निवड बेकायदेशीरपणे करून शासनाचा निधी लाटण्यात आला आहे. याशिवाय जामनेर पंचायत समितीत काही अधिकारी हे वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. त्यांना भाजपचे आमदार गिरीश महाजन यांचे पाठबळ असल्याने ते त्यांच्या इशाऱ्यावर कामे करतात. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अशोक पालवे यांनी प्रशासकपदी असताना फत्तेपूर, गट ग्रामपंचायत गोद्री व जळांद्री येथे 15 व्या वित्त आयोगाच्या निधीत अपहार केला आहे. या साऱ्या प्रकारची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संजय गरुड यांनी केली.