जळगाव -माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आज सायंकाळी त्यांचे जळगावात आगमन होत आहे. याच अनुषंगाने, जळगावातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात एकनाथ खडसे यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. कार्यालयाच्या आवारात आकर्षक अशा रांगोळ्या रेखाटल्या आहेत. फुलांचे तोरण, पणत्या लावून कार्यालय सुशोभित करण्यात आले आहे.
एकनाथ खडसेंच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे कार्यालय सज्ज - जळगाव एकनाथ खडसे बातमी
जळगावातील राष्ट्रवादीचे कार्यालय सज्ज झाले असून एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर कार्यकर्त्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाला खडसेंच्या पक्ष प्रवेशामुळे गतवैभव प्राप्त होणार आहे.
![एकनाथ खडसेंच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे कार्यालय सज्ज ncp office is ready to welcome eknath khadse in jalgaon](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9298885-651-9298885-1603549921793.jpg)
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. पक्षसंघटन देखील मजबूत होणार असल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, एरवी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाला खडसेंच्या पक्ष प्रवेशामुळे गतवैभव प्राप्त होणार असल्याची चर्चा आहे. खडसेंचे जळगावात आगमन झाल्यानंतर राष्ट्रवादी कार्यालयात त्यांचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. याठिकाणी छोटेखानी कार्यक्रमात जिल्हा कार्यकारीणीतील पदाधिकाऱ्यांची ओळख करून दिली जाईल. त्यानंतर खडसे त्यांच्या जळगावातील घरी मुक्कामी असणार आहेत. रविवारी सकाळी ते कार्यकर्ते व समर्थकांसह मुक्ताईनगरला जाईल, अशी माहिती आहे.