जळगाव -भाजप नेते गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात येऊन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपला ललकारले आहे. 'सीडी' लावण्याबाबत मी गंमतीने बोललो होतो. त्यांनी आता खरंच माझ्या मागे ईडी लावली आहे. माझे सीडी लावण्याचे काम अजून बाकी आहे, असा इशारा एकनाथ खडसे यांनी भाजपला दिला.
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी संवाद यात्रेला संबोधित केले काय म्हणाले खडसे?
यावेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, "राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर मी माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावेल, असे गंमतीने म्हणालो होतो. त्यावेळी जयंतराव मला म्हणाले होते, तुमच्या मागे ईडी लागली तर..., तेव्हा मी म्हणालो होतो, मग मी सीडी लावेल. आता खरंच माझ्या मागे ईडी लागली आहे. त्यामुळे आता मी सीडी लावण्याचे काम करणार," असा इशारा खडसेंनी यावेळी दिला.
जळगावात पक्ष विस्तारासाठी रणनीती -
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी १० जागा लढवते. येथे पक्ष बळकट करण्यासाठी एकनाथ खडसे यांच्या अनुभवाचा फायदा करून घ्यायला हवा. आपण ताकदीने काम केले तर सहकार क्षेत्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याला जिंकता येतील, असे जयंत पाटील यांनी सांगितले. भाजपने शेतकरी-कामगार वर्गाला नाराज केले आहे. २०२४ च्या निवडणुकीत भाजपला मतदान मिळणे अवघड होईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच पक्ष वाढीच्या कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले.