जळगाव -राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या मुक्ताईनगरात राजकीय भूकंपाची चिन्हे दिसू लागली आहेत. मुक्ताईनगर नगरपंचायतीत शिवसेनेकडून सत्तांतर घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी (26) खडसे समर्थक असलेले 4 तसेच एका अपक्ष नगरसेवकांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आपल्या मनगटावर शिवबंधन बांधले. हा भाजपसह एकनाथ खडसेंना जबर धक्का मानला जात आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ
मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालेले आहे. 17 पैकी 13 नगरसेवक भाजपचे, 3 शिवसेनेचे तर 1 अपक्ष नगरसेवक आहे. अपक्ष नगरसेवकाने भाजपाला पाठींबा दिल्याने संख्याबळ 14 होऊन, याठिकाणी भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवले होते. येथील नगराध्यक्षा नजमा तडवी यांच्यासह सत्ताधारी गटातील नगरसेवक हे खडसे गटाचे समर्थक आहेत. खडसेंनी भाजपा सोडून राष्ट्रवादीत जाणे पसंत केले असले; तरी हे नगरसेवक खडसेंच्या गटाचेच मानले जातात. मात्र, अलीकडच्या काळात सत्ताधारी गटात कुरबुरी सुरू होत्या. दोन दिवसांपूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांना बहुमताने मंजुरी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही केले होते.
शिवसेनेकडून 6 तर खडसेंकडून 5 नगरसेवकांच्या पक्षांतराचा दावा
नगरसेवकांच्या पक्षांतराबाबत शिवसेनेचे स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले जात आहेत. अपक्षासह भाजपाच्या 6 नगरसेवकांनी बुधवारी मातोश्रीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तर आज (27 मे) भाजपाचे अजून काही नगरसेवक शिवसेनेत दाखल होतील, असा दावा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तर एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरातील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना भाजपाचे 4 आणि 1 अपक्ष अशा 5 नगरसेवकांनी पक्षांतर केल्याचे सांगितले. भाजपाचे 9 नगरसेवक हे मुक्ताईनगरातच असून, नगराध्यक्षा नजमा तडवी या देखील घरीच आहेत. त्यामुळे नगरसेवकांच्या पक्षांतराबाबत माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या चुकीच्या असल्याचेही खडसेंनी सांगितले.
दरम्यान, भाजपच्या अजून 4 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला तर शिवसेनेचे संख्याबळ वाढून भाजपावर नगरपंचायत गमावण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.