जळगाव -बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जदयू युतीला म्हणजेच 'एनडीए'ला काठावर बहुमत मिळाले. या निवडणुकीत राजद नेता तेजस्वी यादव यांनी एकट्याने लढा देत लक्षणीय यश मिळवले आहे. तेजस्वी यादवांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. त्यांचे यश भाजपपेक्षा उठून दिसणारे आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ खडसे जळगावात त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. बिहार विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत पत्रकारांनी खडसेंना विचारणा केली असता ते म्हणाले की, तेजस्वी यादव यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर या निवडणुकीत एक व्यक्ती एका बाजूला आणि संपूर्ण देशाची शक्ती एका बाजूला होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नितीश कुमार असे दिग्गज नेते समोर असताना तेजस्वी यादव यांनी शर्थीने लढा देत त्यांना हैराण करून सोडले. यादवांनी एकट्याच्या बळावर ७५ आसपास जागा मिळवल्या. हे काही कमी नाही. वास्तविक वडील तुरुंगात होते, सामाजिक बदनामी झालेली असताना तेजस्वी यादवांनी एकट्याने मेहनत केली. त्यांच्या यशाचे कौतुक केले पाहिजे, असे मत खडसेंनी व्यक्त केले.