जळगाव -राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे आज जळगावात भाजपवर चांगलेच बरसले आहेत. ईडी चौकशीच्या मुद्द्यावरून खडसे यांनी आपल्या मनातील खदखद पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने पक्ष कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
नाथाभाऊने पक्ष बदलला म्हणून तुम्ही कितीही छळ करा, हा काही पहिल्यांदा घडलेला प्रकार नाही. मी आता स्वतः अशी मानसिकता करून घेतली आहे की जे होईल ते होईल. मी काही केलेले नाही, म्हणून काय होईल ते पाहू. नाथाभाऊ मजबूत माणूस आहे. तुम्हाला किती बदनाम करायचे तितके करा, पण मी काही झुकणारा किंवा घाबरणारा नाही. ईडी माझ्या मागे लागली म्हणजे माझा चेहरा पण पडणारा नाही. 'चलते रहना' अशीच माझी मानसिकता. यांनी कितीही बदनामी केली तरी नाथाभाऊ कसा आहे, हे जनतेला 40 वर्षांत माहिती नाही का? 'जाहिल यू ही बदनाम है, हमको गम से क्या काम है, ये मुस्कुराती जिंदगी जिंदादिली का नाम है', असा शेर बोलून दाखवून खडसेंनी भाजपला जोरदार टोला लगावला.
अशा पद्धतीने छळणे योग्य नाही -
ज्याने भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार केला आहे, त्याला कायद्याने शिक्षा व्हायलाच हवी, या मताचा मी आहे. पण ज्या माणसाच्या चार वेळा चौकश्या झाल्या, सीबीआय, इन्कम टॅक्सने केलेल्या चौकशीत काहीही तथ्य निघाले नाही. तरी नंतर अशा पद्धतीने छळणे योग्य नाही. हे निव्वळ राजकारण आहे, हे महाराष्ट्राची जनता जाणून आहे. विरोधकांना काय वाटेल ते वाटेल पण 'मी पुन्हा येईल', असे म्हणत खडसेंनी फडणवीसांचे नाव न घेता त्यांना चिमटा काढला. मी थांबणाऱ्यांमधला नाही. 40 वर्षांच्या राजकीय जीवनात अनेक चढउतार पाहिले आहेत, असे सांगत त्यांनी 'चलते रहो, रुक जाना नही, तू कही हारके, काटो मे चलके मिलेंगे रास्ते बहार के', हा शेर म्हटला.
हेही वाचा -जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक; खडसे-महाजनांच्या उपस्थितीबाबत उत्सुकता
जावयाला तरी त्रास द्यायला नको होता -
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी, माझी ईडीची चौकशी त्यांनी लावली हे मान्य केले आहे. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला कळले तरी की माझी चौकशी का सुरू आहे. पण अशा रितीने त्रास देणे योग्य नाही. जावयाला तरी असा त्रास द्यायला नको होता. माझ्या जावयाला राजकारण माहिती नाही. त्यांनी आयुष्यात काही केले नाही. गेली 20 वर्षे ब्रिटनमध्ये नोकरी करतोय. पण त्यांना विनाकारण छळले जात आहे. त्यांचा या प्रकरणात व्यवहार फक्त 2 कोटींचा आहे. त्यासाठी देशाची सर्वोच्च यंत्रणा ईडी चौकशी करतेय. महाराष्ट्रातील जनता हे सर्व पाहतेय आणि जनता यांना माफ करणार नाही. योग्य वेळी जनता उत्तर देईल. एखाद्या निरपराध माणसाला त्रास होत असेल तर ते मलाच नाही तर कोणालाही आवडणार नाही.