महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ज्यांना राजकारणात आणले तेच गद्दार निघाले, जुने हिशेब चुकते करणार' - खडसेंची ईडी चौकशी प्रकरण

फक्त पक्ष बदलून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, त्यामुळे नाथाभाऊला सोडायचे नाही, जाणीवपूर्वक छळून त्रास द्यायचा, त्यामुळे ईडीच्या चौकशीसारखे उपद्व्याप मागे लावण्यात आले. मात्र, नाथाभाऊ कमजोर नाही. जो होगा... सो होगा... असे म्हणत एकनाथ खडसे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

एकनाथ खडसे यांनी विरोधकांचा समाचार घेतला
एकनाथ खडसे यांनी विरोधकांचा समाचार घेतला

By

Published : Feb 13, 2021, 10:50 AM IST

Updated : Feb 13, 2021, 2:27 PM IST

जळगाव- ज्यांना बोट धरून मी राजकारणात आणले, तेच गद्दार निघाले. त्यांनी माझ्याशी गद्दारी केली. गद्दारांची ही फौज आता बाहेर निघाली आहे. मी पक्ष सोडला नाही तर मला पक्ष सोडायला भाग पाडण्यात आले. त्यामुळे जुने हिशेब चुकते करण्यासाठी मी राष्ट्रवादीमध्ये दाखल झालो आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपमधील विरोधकांचा समाचार घेतला.

'ज्यांना राजकारणात आणले तेच गद्दार निघाले,

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील गोदावरी मंगल कार्यालयात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खडसे बोलत होते. या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, संतोष चौधरी, अरुण पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर, जळगाव महानगराध्यक्ष अभिषेक पाटील आदींची उपस्थिती होती. यावेळी एकनाथ खडसे यांनी आपल्या 'होम पीच'वर जोरदार बॅटिंग करत भाजप आणि विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. दरम्यान, आपला बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगर मतदारसंघात खडसे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. याप्रसंगी शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

जे बापाला होत नाही, ते तुम्हाला काय होणार?'

असे काय झाले एकाएकी की नाथाभाऊला भ्रष्टाचारी ठरवून बदनाम केले गेले. ज्यांना मी बोट धरून मोठे केले, त्यांनीच माझ्याविषयी षडयंत्र रचले, तेच गद्दार निघाले. जे बापाला होत नाही, ते तुम्हाला काय होणार? या गद्दारांची फौज आता अंड्यामधून बाहेर पडली आहे. मी पक्ष सोडला नाही तर तुम्हीच पक्ष सोडायला भाग पाडले, असेही एकनाथ खडसे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, तुम्हाला बिडी माहिती असेल पण ईडी माहिती नसेल. फक्त पक्ष बदलून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, त्यामुळे नाथाभाऊला सोडायचे नाही, जाणीवपूर्वक छळून त्रास द्यायचा, त्यामुळे ईडीच्या चौकशीसारखे उपद्व्याप मागे लावण्यात आले. मात्र, नाथाभाऊ कमजोर नाही. जो होगा... सो होगा... असे म्हणत एकनाथ खडसे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. नाथाभाऊ गेला तर छिद्र सुद्धा पडणार नाही, म्हणणारे नुसती फडफड करत राहतात. मात्र, यांची गावात निवडून यायची क्षमता नसून चार लोकंही तुमच्या पाठीशी नाहीत. एक ग्रामपंचायत निवडून आणू शकले नाहीत आणि हे नेते झाले होते. हे नेते झाले ते नाथाभाऊच्या बळावर, अशा शब्दांत नाव न घेता एकनाथ खडसे यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

खडसेंच्या पुनर्वसनाचे काय?

एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांचे जे नुकसान मागच्या निवडणुकीत झाले; ते व्याजासकट येणाऱ्या विधानसभेत भरून काढू. त्यांना सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून आणू. त्याकरिता संपूर्ण ताकद राष्ट्रवादी काँग्रेस उभी करेल, असे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात केले. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीचे काय? असा प्रश्न निर्माण झाला असून, भाजपने ज्या पद्धतीने मागील विधानसभेवेळी एकनाथ खडसे यांना उमेदवारी नाकारून ऐनवेळी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली होती. भाजपच्या पावलावर पाऊल टाकून राष्ट्रवादी काँग्रेसनेही मुक्ताईनगर मतदारसंघातून रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्याचे सूतोवाच केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही एकनाथ खडसे यांचे पुनर्वसन होणार की नाही? याबाबतही राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगली आहे.

Last Updated : Feb 13, 2021, 2:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details