जळगाव -'बीएचआर' पतसंस्थेमधील कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार समोर आणल्यानेच आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लावण्यात आला आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आज (शुक्रवारी) पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात खडसेंची पुन्हा आगपाखड केली. दरम्यान, विरोधकांनी आपल्या बदनामीचे षडयंत्र रचल्याचे सांगत खडसेंनी आपल्या भाषणात जिल्ह्यातील एका बड्या नेत्याला लक्ष्य केले. त्या नेत्याकडे हजारो कोटी रुपयांची बेनामी संपत्ती असल्याचा गौप्यस्फोट देखील त्यांनी यावेळी केला.
खडसेंनी केला खुलासा -
बोदवड येथे आज (शुक्रवारी) दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. एकनाथ खडसे यांची मेळाव्याला प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पाटील आणि खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यादेखील उपस्थित होत्या. मेळाव्याला मार्गदर्शन करताना खडसेंनी ईडीच्या चौकशीवरून भाजपवर थेट निशाणा साधला. दोन दिवसांपूर्वीच खडसे यांच्याविरोधात ईडीची कारवाई होऊन त्यांना अटक करण्यात आली, त्यांच्या फार्म हाऊसवर जप्ती आली, अशी चर्चा रंगल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. मात्र, खडसे यांनी या सर्व अफवा असल्याचे सांगून दोन दिवस आपण खासगी कामानिमित्त बाहेरगावी असल्याचे स्पष्ट केले. बाहेरगावाहून परतल्यानंतर खडसे यांनी बोदवड येथे झालेल्या मेळाव्यात आपली भूमिका मांडली.
हेही वाचा -अनिल देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयाचा समन्स; 16 नोव्हेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश