जळगाव - खडसे स्वतःच्या लेकीला का निवडून आणू शकले नाहीत? असे विचारत प्रसाद लाड यांनी खडसेंना चिथावले होते. त्यावर, जनतेने मला सलग ६ वेळा निवडून दिले आहे. प्रसाद लाड यांनी जनतेमधून किमान एकदा तरी निवडून येऊन दाखवावे, असे खुले आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांना दिले आहे.
प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे एकनाथ खडसे मुक्ताईनगर येथील त्यांच्या फार्महाऊसवर पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मी भाजपमधून गेल्याचा परिणाम होत नसेल, तर भाजपचे पदाधिकारी वारंवार एकनाथ खडसे गेल्यावर काही एक परिणाम होणार नाही, असे का म्हणतात? माझे नाव भाजपचे लोक वारंवार का घेत आहेत? असा सवाल एकनाथ खडसे यांनी विचारला. उत्तर महाराष्ट्रात भाजपची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे, या ठिकाणी पूर्वीपेक्षा कमी आमदार निवडून आले आहेत, असेही खडसे म्हणाले. तसेच, माझ्या मुलीचा पराभव करण्यासाठी पक्षविरोधी काम करण्यात आले. भाजप पदाधिकार्यांचा आतूनच ही जागा पाडण्यासाठी पाठिंबा होता, असा पुनरुच्चारही एकनाथ खडसे यांनी केला.
काय म्हणाले होते प्रसाद लाड?
राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे यांना डोक्यावर चढवले आहे. एकनाथ खडसे यांच्यात इतकीच ताकद होती, तर मग मुक्ताईनगरमधून ते स्वत:च्या मुलीला का निवडून आणू शकले नाहीत? असा सवाल भाजप नेते प्रसाद लाड यांनी उपस्थित केला होता. भाजप सोडल्यानंतर आता एकनाथ खडसे यांचा उलट प्रवास सुरू झाला आहे. स्वत:चे अस्तित्व दाखवण्यासाठी त्यांची तडफड सुरू आहे. त्यांना काय करायचे ते करू दे, आम्ही उत्तर महाराष्ट्रात आमच्या परीने काम सुरू ठेवू. उत्तर महाराष्ट्रात भाजपला मानणारा एक वर्ग आहे. त्या ठिकाणी गिरीश महाजनही आहेत. त्यामुळे, शरद पवार यांच्या दौऱ्याने फरक पडणार नाही. आम्ही आमचे काम करत राहू, असेही प्रसाद लाड म्हणाले होते.
शरद पवारांचा दौरा रद्द झालेला नाही तर पुढे ढकलला -
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा उत्तर महाराष्ट्र दौरा हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परवानगी नाकारल्याने पुढे ढकलला आहे. हा दौरा रद्द झालेला नाही, असे खडसेंनी सांगितले.
हेही वाचा-दुचाकी घसरल्याने ट्रकच्या चाकाखाली येऊन पिता-पुत्र ठार; जळगावच्या नेरीजवळ अपघात