जळगाव - जिल्ह्यातील ११ मतदारसंघांपैकी जळगाव शहर हा प्रमुख मतदारसंघ आहे. राजकीय हालचालींचा केंद्रबिंदू म्हणून या मतदारसंघाकडे पाहिले जाते. याठिकाणी भाजपचे उमेदवार विद्यमान आमदार सुरेश भोळे आणि राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील यांच्यात सरळ लढत आहे. जळगावमध्ये भाजप मजबूत स्थितीत असून त्यामानाने राष्ट्रवादीची स्थिती कमकुवत आहे. या मतदारसंघात मूलभूत सुविधा तसेच शहराचा रखडलेला विकास या मुद्यांचे प्रमुख आव्हान आहे. या मुद्यांना ढाल करत भाजपची कोंडी करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. यात राष्ट्रवादीला कितपत यश येते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जळगाव शहर मतदारसंघात भाजपची स्थिती मजबुत असून ५७ नगरसेवकांसह महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि सेनेत युती असल्याने महापालिकेत सेनेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १५ नगरसेवकांची थेट मदत भाजपला होत आहे. त्यामुळे भाजप उमेदवार सुरेश भोळे यांचे पारडे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार अभिषेक पाटील यांच्या तुलनेत जड आहे. याठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीप्रमाणे मनसेकडून अॅड. जमील देशपांडे, बहुजन समाज पार्टीकडून अशोक शिंपी तसेच वंचित बहुजन आघाडीकडून शेख शफी शेख नबी रिंगणात आहेत. परंतु त्यांचा फार काही करिश्मा चालणार नाही. याठिकाणी भाजप बाजी मारेल, अशी स्थिती आज तरी दिसत आहे.
हेही वाचा -अमळनेरात भूमिपूत्र विरुद्ध आयात उमेदवार या मुद्यावरून घमासान; काट्याच्या लढतीमुळे वातावरण गरम
जळगाव शहराचा पूर्व इतिहास-
जळगाव शहर मतदारसंघ म्हटला तर माजीमंत्री सुरेश जैन यांचे नाव डोळ्यासमोर येते. सुरेश जैन यांनी तब्बल ९ वेळा आमदार म्हणून विजय मिळवला होता. मात्र, दहाव्यांदा आमदारकीचा विक्रम करण्यासाठी २०१४ मध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या जैन यांचा पराभव करून भाजपने जळगाव शहर मतदारसंघात पाय रोवले. भाजपचे सुरेश भोळे यांनी जैन यांचा धक्कादायक पराभव केला होता. जळगाव घरकुल घोटाळ्यात अटक झाल्याने ही निवडणूक जैन यांनी कारागृहातून लढवली होती. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जैन यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली. दुसरीकडे पक्षाकडून माजीमंत्री एकनाथ खडसेंचे पंख छाटण्यास सुरुवात झाल्यानंतर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचा उदय झाला. तेव्हा त्यांनी जळगाव शहरावर लक्ष केंद्रीत केले. जैनांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी त्यांनी महापालिका निवडणुकीत आपली ताकद लावली आणि महापालिकेवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली. इथेच जैनांची सद्दी संपुष्टात येऊन जळगावात भाजप बळकट झाली.