जळगाव- सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर अत्यंत कमी असताना केंद्र सरकारने इंधनाचे दर वाढवले आहेत. त्यामुळे जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारच्या ध्येय-धोरणांचा निषेध व्यक्त करण्यात आला. इंधनाचे वाढलेले दर कमी करावे, या मागणीसाठी शनिवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
जळगावात इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन - fuel rates in india
एकीकडे संपूर्ण देश कोरोनासारख्या महामारीशी लढत आहे. त्यात आता पुन्हा इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. केंद्र सरकारने इंधनाचे दर कमी करावेत, या प्रमुख मागणीसाठी शनिवारी दुपारी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर अत्यंत कमी असताना गेल्या महिनाभरापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. महिनाभरात पेट्रोलचे दर १० ते ११ रुपयांनी तर डिझेलचे दर ८ ते १० रुपयांनी वाढले आहेत. देशात काही ठिकाणी तर इतिहासात प्रथमच डिझेलचे दर हे पेट्रोलपेक्षा अधिक आहेत. इंधनाचे दर वाढल्याने आता महागाईचा भडका होण्याची भीती आहे. एकीकडे संपूर्ण देश कोरोनासारख्या महामारीशी लढत आहे. त्यात आता पुन्हा इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. केंद्र सरकारने इंधनाचे दर कमी करावेत, या प्रमुख मागणीसाठी शनिवारी दुपारी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. शिष्टमंडळात माजीमंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, माजी नगरसेविका अश्विनी देशमुख, कल्पना पाटील, वाल्मिक पाटील यांचा समावेश होता.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केल्यानंतर माजी मंत्री गुलाबराव देवकर म्हणाले की, केंद्र सरकारने इंधनाचे वाढलेले दर त्वरित मागे घ्यावेत. देश कोरोनाशी लढत असताना आता सर्वसामान्य नागरिकांना इंधन दरवाढीचा फटका बसला आहे. इंधनाचे दर वाढल्याने महागाईचा भडका होईल, अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांनी जगायचे कसे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तर जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. कोरोनामुळे सर्व काही ठप्प आहे. हाताला कामधंदा नाहीये. अशा परिस्थितीत महागाई भडकल्याने लोकांना जगणे कठीण होईल, असे सांगितले.