जळगाव -राज्यात सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू, अशी घोषणा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी समाचार घेतला. पवार म्हणाले, उद्धव ठाकरेंनी गेल्या पाच वर्षात सत्तेत असताना काय केले? तसेच सत्तेत असताना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा का नाही केला. जळगाव येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा - शरद पवार, अजित पवार यांच्यावर टीका; मात्र उध्दव ठाकरेंकडून 'आरे'चा उल्लेखही नाही
पवार म्हणाले, सत्ता आली तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. परंतु, गेल्या पाच वर्षाच्या सत्तेच्या काळात त्यांनी काय केले? त्यावेळी का नाही केला केला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा? पाच वर्षाच्या सत्ताकाळात केलेल्या कामाची माहिती त्यांनी लोकांना द्यावी. असे सांगितले तरच लोक त्याकडे लक्ष देणार आहेत. अन्यथा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतीमालाला नसलेला भाव, राज्यातील विकास या प्रश्नाकडे सत्ताधारी पक्षाचे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या पाच वर्षात या सरकारने कोणतीही विकासाची कामे केलेली नाहीत, असेही पवार यावेळी म्हणाले.