जळगाव - जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे लॉकडाऊनच्या काळात बुधवारी आठवडी बाजार भरला होता. या बाजारात फळे, भाजीपाला तसेच इतर वस्तूंच्या खरेदीसाठी शेंदुर्णीसह आजूबाजूच्या गावांमधील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. कुठेही सुरक्षित अंतराचे पालन करण्यात आले नाही. अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती निर्माण झाली होती. महाविकास आघाडी सरकारच्या बदनामीसाठी सत्ताधाऱ्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
लॉकडाऊनच्या काळात शेंदुर्णीत भरला आठवडी बाजार; सरकारच्या बदनामीसाठी सत्ताधाऱ्यांचे कृत्य, विरोधकांचा आरोप - latest jalgaon news
शेंदुर्णी येथे लॉकडाऊनच्या काळात बुधवारी आठवडी बाजार भरला होता. या बाजारात फळे, भाजीपाला तसेच इतर वस्तूंच्या खरेदीसाठी शेंदुर्णीसह आजूबाजूच्या गावांमधील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. कुठेही सुरक्षित अंतराचे पालन करण्यात आले नाही. अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती निर्माण झाली होती. महाविकास आघाडी सरकारच्या बदनामीसाठी सत्ताधाऱ्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांची गर्दी होणार नाही, या दृष्टीने उपाययोजना कराव्यात म्हणून राज्य सरकारने निर्देश दिले आहेत. परंतु, असे असताना बुधवारी शेंदुर्णीत आठवडी बाजार भरविण्यात आला होता. या बाजारात कुठेही सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आले नव्हते. दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठीच नगरपंचायतमध्ये सत्तेत असलेल्या भाजप सत्ताधाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना हाताशी धरून हा प्रकार केला आहे, असा आरोप विरोधीपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका वैशाली गुजर आणि मोहसिनाबी खाटीक यांनी केला. या विषयासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी अरेरावी केल्याचेही त्यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने आठवडे बाजार भरवूच नयेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
शेंदुर्णी नगरपंचायतीत भाजपची एकहाती सत्ता आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख विरोधीपक्ष असून बुधवारी भरलेल्या आठवडे बाजाराच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी देखील राज्य सरकारच्या निर्देशांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. सत्ताधारी व मुख्याधिकाऱ्यांनी मात्र या विषयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले आरोप फेटाळून लावले.