जळगाव -भाजपचे माजीमंत्री गिरीश दत्तात्रय महाजन व त्यांचे समर्थक रामेश्वर पुनमचंद नाईक यांच्यापासून आपल्या जीवितास धोका आहे. त्यामुळे मला व कुटुंबीयांना शासनाच्या वतीने पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशा आशयाची लेखी तक्रार नुकतीच जामनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
गिरीश महाजनांसह त्यांच्या समर्थकांपासून जीवाला धोका; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची पोलिसात तक्रार - गिरीश महाजनापासून जीवाला धोका असल्याची लोढांची तक्रार
प्रफुल्ल लोढा यांनी गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांच्यावर निरामय फाउंडेशन, जी. एम. फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य सेवेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचाही आरोप केला आहे. याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणीही लोढा यांनी केली आहे. दरम्यान, लोढा यांनी गिरीश महाजन, रामेश्वर नाईक यांच्यासोबतच नाईक यांचे नातेवाईक तसेच काही अधिकाऱ्यांची देखील नावे तक्रारीत घेतली असून, त्यांच्यापासून जीवितास धोका असल्याचे म्हटले आहे.
प्रफुल्ल लोढा यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना जामनेर पोलीस निरीक्षकांच्या माध्यमातून लेखी तक्रार केली आहे. आपल्या तक्रारीत लोढा यांनी म्हटले आहे की, माजीमंत्री गिरीश महाजन व त्यांचे समर्थक रामेश्वर नाईक यांच्यापासून माझ्या व माझ्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे. यापूर्वीही मी 18 जूनला पोलीस अधीक्षक तसेच मुख्यमंत्री यांना तक्रार अर्ज सादर केला आहे. गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून मी माझ्या काही हितचिंतकांकडून वर्गणी गोळा करून पोलीस बंदोबस्त घेतला आहे. परंतु, आता मला पोलीस बंदोबस्तासाठी पैसे भरणे शक्य नाही. त्यामुळे मला पोलीस बंदोबस्त देण्यात यावा. रामेश्वर नाईक यांनी 30 व 31 जुलैला व्हॉट्सअप कॉलिंगद्वारे कॉल करून आमच्या नादी लागू नको, आमचे खूप मोठ्या लोकांशी संबंध आहेत. तुला मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश तसेच बिहारमधील गुंडांमार्फत किंवा वाहनाने अपघात करून जीवे मारून टाकू, अशी धमकी दिली, असेही प्रफुल्ल लोढा यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या विषयासंदर्भात गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधला असता तो झाला नाही.
गैरव्यवहाराचे केलेत आरोप -
या तक्रारीत प्रफुल्ल लोढा यांनी गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांच्यावर निरामय फाउंडेशन, जी. एम. फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य सेवेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचाही आरोप केला आहे. याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणीही लोढा यांनी केली आहे. दरम्यान, लोढा यांनी गिरीश महाजन, रामेश्वर नाईक यांच्यासोबतच नाईक यांचे नातेवाईक तसेच काही अधिकाऱ्यांची देखील नावे तक्रारीत घेतली असून, त्यांच्यापासून जीवितास धोका असल्याचे म्हटले आहे.