जळगाव -केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 100 रुपयांनी वाढ केली आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने रस्त्यावर चूल पेटवा आंदोलन करून भाकरी भाजल्या. तसेच गॅस दरवाढ लगेच मागे घेण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पंतप्रधानांनी आश्वासन पाळले नाही-
गेल्या महिन्याभरात केंद्र सरकारने घरगुती गॅसच्या दरात 100 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे सिलिंडरचे दर 700 रुपयांच्या घरात गेले आहेत. केंद्रात सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधानांनी कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंमध्ये वाढ करणार नसल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन पंतप्रधानांनी पाळले नाही. उलट गॅसच्या दरात सातत्याने वाढ केली जात आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. या दरवाढीमुळे नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यामुळे आम्ही या दरवाढीचा निषेध करत असल्याचे आंदोलक महिलांनी सांगितले.