जळगाव- कोरोना विषाणूच्या संसर्गास रोखण्यासाठी धार्मिक, सामाजिक, वैयक्तिक कार्यक्रमावर बंदी आहे. मात्र तरीही राष्ट्रवादीच्या माजी जि. प. सदस्याने आपला वाढदिवस अनेकांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा केला. या महाशयांनी वाढदिवसाचा केक चक्क तलवारीने कापत आपल्या भाईगिरीची उपस्थितांसमोर छाप पाडली. या साऱ्या प्रकाराचे अनेकांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. हे चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.
आरारारा खतरनाक . . . राष्ट्रवादीच्या माजी जि. प. सदस्याने तलवारीने कापला वाढदिवसाचा केक - राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा परिषद सदस्याचा कारनामा
चोपडा तालुक्यातील वर्डी-गोरगावले गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय दत्तात्रय पाटील उर्फ बाळासाहेब यांचा रविवारी वाढदिवस होता. त्यांनी आपल्या मित्र-परिवारासोबत वर्डी येथे वाढदिवस साजरा केला. यावेळी खास विजय पाटील यांना बसण्यासाठी महाराजा पद्धतीचे आसन, केक कापण्यासाठी चकाकणारी धारदार तलवार पण आणण्यात आली होती.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वर्डी-गोरगावले गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय दत्तात्रय पाटील उर्फ बाळासाहेब असे तलवारीने केक कापणाऱ्या माजी सदस्याचे नाव आहे. विजय पाटील यांचा रविवारी वाढदिवस होता. त्यांनी आपल्या मित्र-परिवारासोबत वर्डी येथे वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमासाठी एक छोटेखानी मंडपही टाकण्यात आला होता. त्याचप्रमाणे, खास विजय पाटील यांना बसण्यासाठी महाराजा पद्धतीचे आसन, केक कापण्यासाठी चकाकणारी धारदार तलवार पण आणण्यात आली होती. सोबत संगीत व्यवस्था अशा प्रकारचे शाही नियोजन या कार्यक्रमासाठी करण्यात आलेले होते. विजय पाटील यांनी सर्वांसमक्ष तलवारीने केक कापला. यावेळी त्यांचे कार्यकर्ते तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांकडून त्यांनी शुभेच्छाही स्वीकारल्या.
कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असताना राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा परिषद सदस्याने आपला वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करणे कितीपत योग्य आहे ? असा सवाल उपस्थित झाला आहे. दरम्यान, या कार्यक्रमाचे मोबाईलमध्ये केलेले चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, पोलीस याप्रकरणी काय कारवाई करतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.