जळगाव - भाजपने जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 आणि कलम 35 अ हटविण्याचा घेतलेला निर्णय देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा अभूतपूर्व निर्णय होता. ज्या निर्णयाविषयी आधी विचार करणे देखील अशक्य वाटायचे, तो निर्णय भाजपने घेतला. मात्र, राष्ट्रहिताचा असलेल्या या निर्णयाबद्दल काही राजकीय पक्ष व नेते राजकारण करत आहेत. हिंमत असेल तर विरोधकांनी त्यांच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात कलम 370 आणि कलम 35 अ परत लागू करण्याचा उल्लेख करावा, असे खुले आव्हान आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना दिले.
विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा रविवारी दुपारी जळगावात पार पडली. या सभेत मोदी बोलत होते. यावेळी मोदींनी केंद्र व राज्य सरकारची वाटचाल, कलम 370, कलम 35 अ, तिहेरी तलाक, भारताची जगातील प्रतिमा या मुद्द्यांवर मते मांडताना विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे, उन्मेष पाटील, सुरतचे खासदार सी. आर. पाटील, आमदार चंदू पटेल यांच्यासह महायुतीचे जिल्ह्यातील सर्व उमेदवार उपस्थित होते.
नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करत जळगावकरांची मने जिंकून घेतली. ते पुढे म्हणाले, जम्मू आणि काश्मीरमधील नागरिकांना मूलभूत सुविधा देखील मिळत नव्हत्या. त्यांना अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले होते. तेथे फक्त दहशतवादाचा विस्तार सुरू होता. मात्र, आम्ही कलम 370 आणि कलम 35 अ हटवून तेथील स्थिती सामान्य करण्यासाठी प्रयत्न केले. जम्मू आणि काश्मीर फक्त जमिनीचा तुकडा नाही तर आपल्या भारत देशाचे मस्तक आहे. तेथील मातीचा प्रत्येक कण भारताचे विचार आणि शक्तीला मजबूत करतो. जम्मू-काश्मीरमध्ये 40 वर्षांपासून असलेल्या असामान्य परिस्थितीला सामान्य करण्यासाठी 4 महिने पण लागणार नाहीत. जम्मू आणि काश्मीरला विकासाच्या वाटेवर आणू, असा विश्वास देखील मोदींनी दिला.
राष्ट्रहिताचा असलेल्या या निर्णयाबद्दल काही राजकीय पक्ष व नेते राजकारण करत आहेत. या विषयावर राजकारण करणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता तुमच्याकडे मतांसाठी येत आहेत. जम्मू आणि काश्मीरविषयी देश जो विचार करतो, त्या उलट हे विरोधक विचार करतात. पण यांनी खोटे अश्रू ढाळणे बंद करावे. हिंमत असेल तर विरोधकांनी त्यांच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात कलम 370 आणि कलम 35 अ परत लागू करण्याचा उल्लेख करावा, असे आव्हानच मोदींनी दिले.
देशवासीयांच्या समर्पणामुळे जगात उंचावली भारताची प्रतिमा-
चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत देशवासीयांनी एनडीए सरकारवर दाखवलेल्या विश्वासामुळे आम्हाला सेवेची संधी मिळाली. नव्या भारताच्या निर्माणासाठी तुम्ही आम्हाला जो कौल दिला, त्याचे आभार मानण्यासाठी मी आलो आहे. जगात भारताची प्रतिमा माझ्यामुळे नाही तर देशवासीयांच्या समर्पणामुळे उंचावली आहे. नव्या भारताचा जोश सारे जग पाहत आहे. देशातील 130 कोटी जनतेमुळे जगात भारतीय लोकशाहीचा गौरव होत आहे. जनतेने दिलेल्या जनादेशामुळे भारताच्या प्रतिभेला बळ मिळाले. म्हणून जगातील प्रत्येक देश आज भारतासोबत यायला तयार आहे. नवा भारत आज कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याची धमक ठेवतो, असेही मोदी यावेळी म्हणाले.
तिहेरी तलाक कायद्याला मुस्लिमांचाही पाठिंबाच-