जळगाव -जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती निवडीत भाजपचा महागोंधळ पाहायला मिळाला. अर्ज दाखल करताना झालेल्या चुकांमुळे भाजपने अधिकृतरित्या जाहीर केलेले उमेदवार स्पर्धेबाहेर पडले. मात्र, सुदैवाने भाजपच्याच उमेदवारांनी बंडखोरी केल्यामुळे त्याठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चालून आलेली आयती संधी हुकली. अन्यथा भाजपवर मोठी नामुष्की ओढवण्याची भीती होती.
भाजपकडून दोन विषय समित्यांसाठी प्रत्येकी एक अर्ज भरणे अपेक्षित असताना एकाच समितीसाठी दोन अर्ज भरण्याचा गलथानपणा झाला. त्यातही भाजपच्याच एका सदस्याने बंडखोरी केल्याने दोन्ही अधिकृत उमेदवारांना माघार घ्यावी लागली. तर दुसऱ्या अन्य समितीत भाजपच्या नाराज सदस्यांनी बंड करून उमेदवारी दाखल केली होती. मात्र, अधिकृत उमेदवाराने या समितीसाठी अर्ज सादर न करता विषय समिती एकचा अर्ज सादर केला. त्यामुळे बंडखोर उमेदवारामुळेच भाजपची इभ्रत वाचली. अन्यथा या समितीवर महाआघाडीचा उमेदवार बिनविरोध निवडून आला असता.
रवींद्र पाटलांच्या बंडाने प्रस्थापितांचा पत्ता कट -
विषय समिती क्रमांक १ साठी भाजपने मधुकर काटे यांच्या नावाची घोषणा केली होती, तर महाआघाडीने सुरेखा पाटील यांना उमेदवारी दिली होती. मात्र, भाजपचेच साकळी-दहिगाव गटाचे सदस्य रवींद्र सूर्यभान पाटील यांनी बंड पुकारत अर्ज दाखल केला. गोंधळात भर म्हणून की काय याच समिती क्रमांक १ मध्ये समिती क्रमांक २ साठी भाजपने दिलेले उमेदवार अमित देशमुख यांचा अर्ज भरला गेला. त्यामुळे रवींद्र पाटलांसाठी दोन्ही प्रस्थापित उमेदवार मधुकर काटे व अमित देशमुख यांची माघार घ्यावी लागली. यात बंडखोर रवींद्र पाटलांच्या पदरात सभापती पद पडले.