जळगाव -जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील नेहता गावात सोमवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 73 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने संतापाच्या भरात पत्नीचा खून केला. त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समोर आल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. कमलाबाई फकिरा वैदकर (वय 63) असे खून झालेल्या वृद्धेचे नाव आहे. तर फकिरा तुकाराम वैदकर (वय 73) असे त्यांच्या पतीचे नाव आहे. दोघेही रावेर तालुक्यातील नेहता गावातील रहिवासी होते.
या घटनेचे मूळ कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, कौटुंबीक वादातून हा प्रकार घडला असावा, असा अंदाज पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर वर्तवला आहे. वैदकर दाम्पत्य हे नेहता गावातील समाज मंदिरामागे असलेल्या नवीन प्लॉट भागात राहत होते. फकिरा वैदकर हे तापट स्वभावाचे होते. तापट स्वभावामुळे त्यांचे त्यांच्या दोन मुलांशीही पटत नव्हते. त्यांची दोन्ही मुले गावातच वेगळे राहत होते. फकिरा वैदकर नेहमी क्षुल्लक कारणावरून पत्नीशी वाद घालत असत. ते पत्नीला नेहमी जीवे मारण्याची भाषा वापरत असत, अशी माहिती पोलिसांनी काही ग्रामस्थांचे जबाब नोंदवल्यानंतर समोर आली आहे. एखाद्या विषयावरून दोघांमध्ये वाद झाला असावा, त्यातूनच ही घटना घडल्याची शक्यता आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.