जळगाव - अमळनेरात पूर्व वैमनस्यातून तिघांनी लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केल्याने एकाचा मृत्यू झाला. ही घटना ३१ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास अमळनेर शहरातील म्हाडा कॉलनीत घडली. कमल मुनीर पथरोड (रा. अमळनेर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीघांना अटक केली आहे.
कमल पथरोडचा जागीच मृत्यू-
३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता शीतल मुकेश सैंदाणे व कमल पथरोड यांच्यात भांडण सुरू होते. ते एकमेकांना शिवीगाळ करत होते. त्यावेळी राजेश जाधव यांनी हे भांडण पाहिले. मात्र, किरकोळ भांडण असल्याने मिटून जाईल म्हणून त्याने दुर्लक्ष केले. त्यानंतर सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास शीतल सैंदाणे, मुकेश गोकुळ सैंदाणे व भाग्यश्री उर्फ भुरी राजेंद्र पाटील या तिघांनी कमल पथरोड याला बोलावून घेतले. सायंकाळच्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी पुन्हा वाद घालायला सुरुवात केली. यावेळी लाठ्या-काठ्यांनी कमलच्या छातीवर, डोक्यावर, कपाळावर व हातावर मारहाण केली. त्यात कमल पथरोड गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. अशी माहिती पोलिसांनी दिली.
दोन तास उलटूनही घटनेची वाच्यता नाही-
कमलचा जागीच मृत्यू झालेला होता. घटनास्थळी शीतलच्या हातातील बांगड्या फुटून पडलेल्या होत्या. म्हाडा कॉलनी परिसर हा टाकरखेडा रस्त्यावर शहराबाहेर चार कि.मी. अंतरावर असल्याने खून होऊन दोन तास उलटले. तरी याबाबत भीतीने कोणीही वाच्यता करायला तयार नव्हते. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
तिघांच्या आवळल्या मुसक्या-
पोलिसांना संशयितांची माहिती मिळाल्यावर त्यांनी शीतल, मुकेश व भाग्यश्री उर्फ भुरी यांचा शोध घेतला असता ते तिघे फरार झाल्याचे समजले. तिघांनी पातोंडा येथे एका ठिकाणी आश्रय घेतल्याचे समजल्यावर पोलिसांनी तेथून तिघांना अटक केली. तिघांविरुद्ध खुनाचा व ए अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास डी.वाय.एस.पी. राकेश जाधव करीत आहेत.
मयतावर दाखल होते अनेक गुन्हे-
कमल पथरोड याच्यावर हाणामाऱ्या, शरीरावर वार करणे अशा प्रकारचे काही गुन्हे दाखल असून, त्याला एका खुनाच्या गुन्ह्यात १४ वर्ष शिक्षाही झाल्याची माहिती मिळाली. कालदेखील त्याने शीतल सैंदाणे या महिलेस बरे वाईट बोलण्याने त्यांच्यात भांडण होऊन खून झाल्याची चर्चा आहे.
हेही वाचा-सांगली महापालिकेने सुरू केला 'पुस्तक बँक' उपक्रम