जळगाव - जिल्ह्यात माेठ्या प्रमाणावर पेरणी झालेल्या मूग उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजारातील उच्चांकी भावामुळे आशा पल्लवित झाल्या आहेत. दुसरीकडे पावसामुळे मुगाचे उत्पादन घटून गुणवत्ता खराब झाल्याने शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाल्याचे चित्र आहे.
गेल्यावर्षी परतीच्या पावसामुळे खरिपातील पिकांचे खूपच नुकसान झाले हाेते. त्यामुळे कमी पाण्यात आणि लवकर येणारे पीक म्हणून शेतकऱ्यांनी मूग आणि उडीद या पिकाला प्राधान्य दिले हाेते. मुगाला ७ हजारांचा हमीभाव असून, बाजारात त्यापेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकरी यावर्षी मुगाबाबत आशावादी हाेता; परंतु गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या पावसामुळे ऐन ताेडणीवर असलेल्या मुगाच्या पिकावर पाणी फेरले गेले. ताेडणीवर असलेला मूग संततधार पावसामुळे ताेडला गेला नाही. त्यामुळे झाडावरच मुगाच्या शेंगांना काेंब फुटले आ हेत. पावसामुळे मुगाची गुणवत्ता खराब झाल्याने आणि उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांचे माेठे आर्थिक नुकसान झाले आहे.