जळगाव-जिल्ह्यातील मुक्ताईनगर पंचायत समितीचे माजी सभापती दिनकर ओंकार पाटील यांची हत्या ही राजकीय पूर्ववैमनस्यातून झाल्याचे उघड झाले आहे. मुक्ताईनगर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या तीन दिवसात या प्रकरणाचा उलगडा केला असून, एका ग्रामपंचायत सदस्यासह तिघांना अटक केली आहे. संशयित आरोपींनी एका व्यावसायिक गुन्हेगारास सुपारी देऊन हे हत्याकांड घडवले आहे. पोलीस त्या गुन्हेगाराच्या मागावर आहेत.
दिनकर पाटील यांची हत्या केल्याप्रकरणी कुऱ्हा-काकोडा ग्रामपंचायतीचा सदस्य तेजराव भास्कर पाटील (वय 47), विलास रामकृष्ण महाजन (वय 52) आणि सय्यद साबीर सय्यद शफी (वय 25), तिघे रा. कुऱ्हा-काकोडा, ता. मुक्ताईनगर अशी अटकेतील संशयित आरोपींची नावे आहेत.
दिनकर पाटील यांची धारदार शस्त्राने गळ्यावर वार करत निर्घृणपणे हत्या झाली होती. कुऱ्हा-काकोडा गावातील इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपाच्या आवारातच ही थरारक घटना घडली होती. 17 जून रोजी सकाळी ही घटना समोर आली होती. ही घटना समोर आल्यानंतर सुरुवातीपासून पोलिसांना या घटनेमागे राजकीय वाद असल्याचा संशय होता. त्यानुसार पोलीस तपास करत होते.
घटनेच्या दोन ते तीन दिवस आधी दिनकर पाटील यांच्या संपर्कात असलेल्या सर्वांचे मोबाईल सीडीआर रेकॉर्ड काढून पोलिसांनी त्यांचे स्वतंत्र जबाब नोंदवले होते. त्यात दिनकर पाटील आणि आरोपींमध्ये राजकीय वैमनस्य असल्याचे स्पष्ट झाले होते. तेथूनच पोलिसांना खरे धागेदोरे मिळाले. दरम्यान, दिनकर पाटील यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज मिळवले होते. या फुटेजमध्ये मारेकरी चॉपरसारख्या धारदार शस्त्राने दिनकर पाटील यांच्या गळ्यावर सपासप वार करत असल्याचा थरार कैद झाला होता. हे फुटेजही पोलिसांना तपासकामी मदतीचे ठरले.