जळगाव- राज्य सरकारने मंदिरे खुली करण्याची परवानगी दिली आहे. असे असले तरी जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील श्री संत मुक्ताबाई मंदिर येत्या कार्तिक एकादशीला (दि. 26 नोव्हेंबर) रोजी भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती असल्याने विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 8 महिन्यांपासून राज्यभरात बंद असलेली मंदिरे तसेच धार्मिक स्थळे राज्य सरकारने 16 नोव्हेंबरपासून काही अटी व शर्ती आखून देत भाविकांना दर्शनासाठी खुली केली आहेत. अनेक दिवसांपासून देवदर्शनाची आस लागलेली असल्याने दररोज वाढत्या संख्येने भाविक मंदिरांमध्ये दर्शनाला येत आहेत. कोथळीच्या मुक्ताई मंदिरात देखील दररोज भाविकांची गर्दी वाढत आहे.
हेही वाचा-कार्तिकी एकादशी : तुकोबांचे मंदिरही या तीन दिवशी बंद राहणार
वारकरी व भाविकांनी कार्तिक एकादशीला दर्शनास येऊ नये-
कोरोनाची दुसरी लाट अनेक राज्यात दिसून आली आहे. येत्या कार्तिक एकादशीच्या वारीला राज्यभरातील हजारो भाविक मुक्ताईंच्या दर्शनाला आल्यास कोरोनाचे संक्रमण अधिक वेगाने वाढण्याची शक्यता जास्त आहे. सरकारला सहकार्य आणि सामाजिक जबाबदारी म्हणून व मंदिरात एकाच दिवशी गर्दी होऊ नये, कार्तिक शुद्ध एकादशीला संत मुक्ताबाई मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वारकरी व भाविकांनी कार्तिक एकादशीला दर्शनास येऊ नये, असे आवाहन विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील व मुख्य पुजारी ह. भ. प. रवींद्र महाराज हरणे यांनी केले आहे.