महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

#COVID19 : आदेशाची पायमल्ली करत जळगावच्या खासदारांची बैठक - कोरोना

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सरकारने गर्दी टाळण्याचे आदेश दिले होते. पण, या आदेशाचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी उल्लंघन केल्याचे पाहायला मिळाले.

बैठकीत खासदार उन्मेष पाटील
बैठकीत खासदार उन्मेष पाटील

By

Published : Mar 21, 2020, 5:27 PM IST

Updated : Mar 21, 2020, 5:36 PM IST

जळगाव- कोरोनाचा सर्वत्र धुमाकूळ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यादृष्टीने गर्दी टाळण्याचे आवाहन देखील केले आहे. मात्र, कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सरकारने दिलेल्या आदेशांचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी उल्लंघन केल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी शनिवारी दुपारी महापालिकेत सर्वपक्षीय नगरसेवक, महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावरून खासदार महोदय तसेच इतर लोकप्रतिनिधी कोरोनाविषयी बेफिकीर असल्याचे दिसून आले.

आदेशाची पायमल्ली करत जळगावच्या खासदारांची बैठक

या बैठकीला खासदार उन्मेष पाटलांसोबत आमदार सुरेश भोळे, स्मिता वाघ, चंदूलाल पटेल, महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती अॅड. शुचिता हाडा, महिला व बालकल्याण समिती सभापती शोभा बारी, आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक, विविध योजनांची कामे करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. दीर्घकाळ ही बैठक चालली. खासदार उन्मेष पाटलांनी यावेळी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणारी अमृत पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार योजना, पंतप्रधान आवास योजनेच्या कामाचा आढावा घेतला.

बैठकीविषयी नाराजीचा सूर

खासदारांनी घेतलेल्या आढावा बैठकीविषयी सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर होता. बैठकीसाठी सर्व नगरसेवक तसेच अधिकारी वेळेवर उपस्थित होते. मात्र, खासदार पाटील हे तब्बल तासभर उशिराने बैठकीसाठी महापालिकेत दाखल झाले. त्यावरूनही अनेकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घ्यायला नको होती. यापूर्वी भरपूर वेळ असताना खासदारांना केंद्राच्या योजनांच्या आढावा घ्यायला वेळ नव्हता का? आता सर्वत्र कोरोनाचे सावट असताना आढावा बैठक घेणे उचित आहे का? असे सवाल देखील महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपस्थित केले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली - खासदार पाटील

दरम्यान, याबाबत स्पष्टीकरण देताना खासदार उन्मेष पाटलांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीपूर्वी खबरदारी घेतल्याचे सांगितले. बैठकीत महापालिकेच्या प्रत्येक विभागाचा आढावा घेतला. ज्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली आहे, अशांना बैठकीला बोलावले नाही. सर्वांना सॅनिटायझरने हात स्वच्छ केल्यानंतरच बैठकीला प्रवेश दिला. कोरोनाचा संसर्ग सुरू असला तरी कामे थांबायला नकोत. ही आपली भूमिका होती, असेही उन्मेष पाटील यावेळी म्हणाले.

हेही वाचा -coronavirus : विदेशवारीची माहिती लपवल्याने अमळनेरच्या दाम्पत्यावर गुन्हा

Last Updated : Mar 21, 2020, 5:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details